सोलापूर - मोहोळ तालुक्याची राजकीय राजधानी म्हणून ओळख असलेल्या अनगर ग्रामपंचायतीची निवडणूक गेल्या 68 वर्षांपासून बिनविरोध होत आहे. अनगर ग्रामपंचायतीची स्थापना 1952 साली झाली असून स्थापनेपासून आजतागायत ग्रामपंचायत बिनविरोध होत आहे. अनगरसह, बिटले, खंडोबाचीवाडी, कुरणवाडी, नालबंदवाडी, गलदवाडी, काळेवाडी या ग्रामपंचायतीदेखील बिनविरोध झाल्या आहेत.
12 हजार 225 उमेदवार नशीब अजमावणार-
जिल्ह्यातील 657 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी 12 हजार 225 उमेदवार नशीब अजमावणार आहेत. 657 ग्रामपंचायतींमध्ये 5 हजार 877 जागा जागा आहेत. जिल्ह्यातील 54 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. पक्षाला बाजूला करत स्थानिक आघाड्यांनी आपली पकड मजबूत केली आहे. 604 ग्रामपंचायतीत राजकीय धुराळा उडणार आहे.
स्थानिक राजकीय नेत्यांच्या नाकी नऊ-
स्थानिक राजकीय नेत्यांनी ग्रामपंचायती बिनविरोध करण्यासाठी आपली राजकीय शक्ती लावली होती. पण, रुसवे फुगवे काढता काढता स्थानिक नेत्यांच्या नाकी नऊ आले. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार जरी असले तरी स्थानिक पातळीवर वेगळेच राजकारण सुरू आहे. यामध्ये सर्वच पक्षाच्या नेत्यांना सोबत घेऊन चालावे लागत आहे.