सोलापूर - गोकुळ शुगरचे चेअरमन भगवान दत्तात्रय शिंदे (वय 62, रा. विद्या विहार, सात रस्ता, सोलापूर) यांनी आज सोमवारी सकाळी धावत्या रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोलापूर शहरातील मोदी स्मशानभूमी जवळ असलेल्या रेल्वे रुळाजवळ घडली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भगवान शिंदे यांना 500 कोटींचा कर्ज झाला होता आणि त्या कर्जाच्या दबावाखाली किंवा तणावाखाली त्यांनी आत्महत्या केली असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
मॉर्निग वॉकला गेले आणि घरी परतलेच नाही -
भगवान शिंदे हे दररोज सकाळी मॉर्निंग वॉकला जात होते. वयोमानानुसार शिंदेना रक्तदाब, मधुमेह असे अनेक आजाराने ग्रस्त होते. आज सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे भगवान शिंदे हे मॉर्निंग वॉकला घरातून सकाळी 6 च्या सुमारास बाहेर पडले. पण घरी परतलेच नाही. सकाळी 7.30 च्या सुमारास त्यांचा मृतदेह मोदी जवळील रुळाजवळ आढळून आला. रेल्वे पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी भगवान शिंदे यांना जखमी अवस्थेत रेल्वे रुग्णालयात दाखल केले. पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर स्थानिक पोलिसांच्या मदतीने भगवान शिंदे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला.
भगवान शिंदे यांच्या मृत्यूची माहिती मिळताच मोठे राजकीय नेते सिव्हिलमध्ये दाखल-
भगवान शिंदे यांनी आत्महत्या केली याची माहिती मिळताच, सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मोठी गर्दी झाली होती. माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी सिव्हिलमध्ये मोठी गर्दी केली होती.
अंदाजे 500 कोटींचे कर्ज-
दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री येथे भगवान शिंदे यांचा गोकुळ शुगर या नावाने साखर कारखाना आहे. गेल्या चार-पाच वर्षांपासून हा कारखाना तोट्यात चालत होता. अनेक शेतकऱ्यांना, त्यांनी एफआरपीची रक्कम दिलेली नव्हती. साखर कारखाना चालवण्यासाठी त्यांनी बँकेकडून मोठे कर्ज घेतले होते. पण बँकेने दिलेले कर्ज वेळेवर फेडू न शकल्याने बँकेचे दार बंद झाले होते. शेवटी त्यांनी सावकाराकडून देखील कर्ज घेतले होते. अंदाजे 500 कोटींचे कर्जाचे ओझे त्यांच्या अंगावर होते. अनेक वेळा शेतकऱ्यांनी भगवान शिंदे यांच्या सात रस्ता येथील घरासमोर आंदोलन करून एफआरपीची रक्कम मागितली होती. या सर्व तणावाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा - सोलापूर : अन्न, औषध प्रशासन व पोलिसांमार्फत ताडी विक्रेत्यावर कारवाई
हेही वाचा - पंढरपूरमध्ये भाजप नेत्याला काळे फासणाऱ्या २५ शिवसैनिकांवर गुन्हा दाखल