सातारा - क्रांतीसिंह नाना पाटील रुग्णालयात दाखल असणाऱ्या तिघांच्या कोरोना चाचण्या पॉझीटिव्ह आल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांचा एकूण आकडा 138 वर पोहोचला आहे. यातील एक बाधित महिला सोलापूरची असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
मुळची सोलापूर जिल्ह्यातील 32 वर्षीय महिला मुंबई येथून प्रवास करुन सोलापूरला मोटारीने निघाली होती. शिरवळजवळ मोटार उभी करुन चालक पसार झाला. ही बाब पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर त्या महिलेला साताऱ्यात विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. तिचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. सातारा तालुक्यातील बाधित निष्पन्न झालेले अन्य दोघे ठाणे येथून प्रवास करुन आले आहेत. 26 व 67 वर्ष असे या व्यक्तींचे वय आहे. त्यांनाही गावातच विलगीकरण करुन ठेवण्यात आले होते.
कराडमध्येही बाधित रुग्णाचे 2 निकट सहवासित कोरोनाबाधित असल्याचे आज स्पष्ट झाले. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात 26, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड येथे 64 व उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथील 3 असे एकूण 93 जणांचा अहवाल निगेटिव्ह आल्याचेही डॉ. गडीकर यांनी सांगितले. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाबाधित झालेल्या व्यक्तिंची संख्या 138 झाली असून यापैकी 70 रुग्ण उपचार घेत आहेत. 66 रुग्ण कोरोना मुक्त होवून घरी गेले आहेत. तर केवळ दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.