सोलापूर - माढा तालुक्यातील माजी आमदार धनाजी साठे यांनी पुन्हा घरवापसी केली आहे. त्यांनी आज माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्याबरोबर त्यांचे पुत्र आणि कुर्मुदास सहकारी साखर कारखान्याचे संचालक दादासाहेब साठे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीवेळी साठे कुटुंबीयांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. तब्बल ६ वर्षानंतर साठे कुटुंबीयांनी घरवापसी केली आहे.
माढा तालुक्यातील साठे कुटुंबीय हे एकनिष्ठ काँग्रेसचे मानले जात होते. सातत्याने ते काँग्रेसबरोबर राहिले होते. मात्र, २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत दादासाहेब साठे यांना काँग्रेसने तिकीट नाकारल्याने नाराज होऊन साठेंनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, भाजपमध्येही त्यांची अपूर्ण राहीलेली विकासाची कामे केली नसल्याचे साठे यांनी सांगितले.
धनाजी साठे आणि दिवंगत विलासराव देशमुखांची मैत्री
माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि माजी आमदार धनाजी साठे यांची अतिशय घट्ट मैत्री होती. विलासराव दरवर्षी धनाजी साठे यांच्याकडे हुर्डा पार्टीसाठी येत होते. अगदी विलासराव मुख्यमंत्री झाल्यावरही ते माढ्यात हुर्डा पार्टीसाठी येत होते. त्यांच्या मैत्रीमुळे धनाजी साठेंना विलासरावांनी विधानपरिषदेवरही संधी दिली होती.