रत्नागिरी - कार्तिकी एकादशीनिमित्त संगमेश्वर मधून पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलेल्या 60 भाविकांना विषबाधा झाली. सर्व भाविक रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथील आहेत. पंढरपूर येथील नगरपरिषदेच्या रुग्णालयात सगळ्यांवर उपचार सुरू आहेत. या भाविकांमध्ये वयोवृद्धांचा देखील समावेश आहे.
संगमेश्वर येथील भाविक कार्तिकी एकादशी सोहळ्यासाठी पंढरपूर येथे आले होते. ते धुंडा महाराज मठा शेजारी इनामदार वाड्यात थांबले होते. शुक्रवारी त्यांनी एकादशी असल्यामुळे उपवासाचे पदार्थ खाल्ले होते. रात्री अडीच वाजेच्या सुमारास 60 भाविकांना उलट्या, जुलाबाचा त्रास सुरू झाला. त्या सर्व भाविकांना नगरपरिषदेच्या संसर्गजन्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
![food poisoning to 60 devotees of Sangmeshwar in Pandharpur](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/5016963_749_5016963_1573331277195.png)
या ठिकाणी रुग्णांवर डॉ. धोत्रे उपचार करत आहेत. तसेच नगरपरिषदेचे कर्मचारी तेथे उपस्थित असल्याची माहिती उपमुख्य अधिकारी सुनिल वाळूजकर यांनी दिली. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली आहे.