सोलापूर - सरपंच पदांचे आरक्षण सोडत काढताना झालेल्या चुकांमुळे तीन तालुक्यातील 15 ग्रामपंचायतीचे पुन्हा आरक्षण काढण्यात येणार आहे. यासाठी शासनाकडे मार्गदर्शनपर अहवाल मागवण्यात येणार असल्याची माहिती महसूल उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांनी दिली. यात माढा तालुक्यात 6, करमाळा तालुक्यात 2 तर बार्शी तालुक्यातील 6 ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
माढा व करमाळा तालुक्यातील आरक्षण चुकले
माढा तालुक्यातील परिते, लहू, तांबवे या ग्रामपंचायतीचे आरक्षण अनुसूचित जाती स्त्रीऐवजी अनुसूचित जाती, असे झाले आले. तर ग्रामपंचायत भोगेवाडी-जाखले, अरण व रिधोरे या ग्रामपंचायतीचे आरक्षण अनुसूचित जाती ऐवजी अनुसूचित जाती स्त्री असे काढण्यात आले आहे. करमाळा तालुक्यातील फिसरे व कुंभेज ग्रामपंचायतीचे आरक्षण चुकले आहे.
बार्शी येथील सात ग्रामपंचायतीचे आरक्षण चुकले
बार्शी तालुक्यातील कापसी, सुरडी, तुळशीदास नगर, तांदूळवाडी, ममदापूर, घाणेगाव, व हिंगणी या ग्रामपंचायतीच्या सरपंच आरक्षण चुकीचे निघाले आहे.
शासनाकडून मार्गदर्शन मागवणार
सोलापूर जिल्ह्यातील 15 ग्रामपंचायतीचे आरक्षण चुकल्याचा अहवाल तहसीलदारांकडून प्राप्त झाले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीनुसार आरक्षण बदलण्याबाबत मार्गदर्शन मागविले आहे. शासनाने परवानगी दिल्यानंतर बदल करण्यात येणार आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांनी दिली.
हेही वाचा - सोलापूर : कृषी कायद्यांविरोधात कामगार-शेतकऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालसमोर धरणे