सोलापूर - उजनी धरणातील 5 टीएमसी पाणी इंदापूर तालुक्यातील 22 गावांना दिले जाणार असल्याने, सोलापुरातील शेतकरी व शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. आज शनिवारी 15 मे रोजी जनहीत शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी उजनी धरणावर आंदोलन करत पालकमंत्र्यांचा निषेध केला. तसेच भविष्यात पालकमंत्री दत्ता भरणे यांना जिल्हाबंदी केल्याशिवाय सोडणार नाही, असा इशारा देखील देण्यात आला आहे.
उजनी धरणाची क्षमता
उजनी धरणाची एकूण पाण्याची क्षमता 117 टीएमसी आहे. मृत साठा 63.66 टीएमसी आहे. तर वापराचा पाणी साठा हा 53.57 टीएमसी आहे. उजनी प्रकल्प व त्यावरील सर्व उपसा सिंचन पाणी पुरवठा व औद्योगिक पाणी वापर असे एकूण 84.34 टीएमसी पाणी वापराचे नियोजन आहे.
दत्ता भरणे यांची पत्रकार परिषदेत सारवासारव
सोलापूरच्या उजनी धरणाचे पाणी जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पळविले असल्याचा आरोप जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांमधून होत आहे. परंतु उजनीच्या मूळ पाण्याला धक्का न लावता इंदापूरला पाणी घेऊन जाणार असल्याचे परिपत्रक खडकवासला पाटबंधारे विभागाने काढले असल्याची माहिती पालकमंत्री दत्ता भरणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
'...तर पालकमंत्र्यांना जिल्हाबंदी करू'
भैय्या देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आज शनिवारी 15 मे रोजी सकाळपासून उजनी धारणासमोर मुख्य गेटवर आंदोलन सुरू झाले आहे. सोलापूरच्या वाट्याचे 5 टीएमसी पाणी कदापि जाऊ देणार नाही, पाणी देण्याचा प्रयत्न केल्यास पालकमंत्री दत्ता भरणे यांना सोलापूर जिल्ह्यात प्रवेश बंदी करू, असा इशारा देखील यावेळी आंदोलकांनी दिला आहे.
हेही वाचा - सीरम इन्स्टिट्यूटमध्ये ऑक्सिजन निर्मितीला सुरुवात; 200 रुग्णांची गरज भागणार