सोलापूर : जिल्हाधिकारी कार्यालयात असलेल्या दक्षिण सोलापूर तहसिल कार्यालयासमोर ( South Solapur Tehsil Office ) सोमवारी एका वृद्ध शेतकऱ्याने अंगावरील सर्व कपडे काढून नग्न अवस्थेत बराच वेळ ठिय्या मांडला ( Farmer naked protest ) होता. हे पाहण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. तहसिलदार अमोल कुंभार हे कार्यालयात नव्हते,त्यांना ही बाब माहिती होताच त्यांनी कार्यालय गाठले आणि शेतकऱ्याची व्यथा ऐकून घेतली. तहसीलदार यांनी ताबडतोब धनादेश (चेक) प्रदान करून शेतकऱ्यास आश्वासन दिले. 8 हजार रुपयांच्या नुकसान भरपाई साठी दक्षिण सोलापुर तालुक्यातील शिंगडगाव येथील शेतकऱ्याने हे नग्न आंदोलन केले. या आंदोलनामुळे तहसील कार्यालयात एकच धांदल उडाली होती.
अतिवृष्टीमुळे पिकाचे नुकसान - नग्न आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव कुमार नामदेव मोरे आहे. त्यांचे शेत दक्षिण सोलापूर तालुक्यातील शिंगडगाव येथे आहे. या शेतात मूग या पिकाची पेरणी केली होती. अतिवृष्टी झाल्यामुळे कुमार मोरे यांच्या शेतातील मूग या पिकाचे मोठे नुकसान झाले. अतिवृष्टीनंतर प्रशासनाने पंचनामे करून अनेक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली आहे. पण ही कुमार नामदेव मोरे यांना नुकसान भरपाई अद्यापही मिळाली नसल्याने मोरे हे तहसील कार्यालयात आले होते. मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी थेट अंगावरील सर्व कपडे काढून नग्न आंदोलन केले.
तहसिलदारांनी केली तत्काळ मदत - दक्षिण तहसील विभागाच्या कर्मचाऱ्यास नग्न आंदोलनबाबत समजले असता ते तातडीने तेथे येऊन त्या शेतकऱ्याला कपडे घालण्यास लावले.तहसील कार्यालयामध्ये नेऊन कागदपत्रे दाखवले असता दहा नोव्हेंबर रोजीच त्यांचा अतिवृष्टीचा मदत निधी बँकेकडे पाठवल्याची माहिती मिळाली. तांत्रिक कारणामुळे हे चेक वटले नव्हते.तहसीलदार अमोल कुंभार यांनी ताबडतोब शेतकऱ्याच्या नावे चेक देऊन त्यांना पाठवले याबाबत तहसीलदार यांनी देखील अधिकृत माहिती दिली.