सोलापूर - खासगी सावकारांविरोधा कारवाई व्हावी, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ शोले स्टाईल आंदोलन करणाऱ्या शेतकरी इब्राहिम मुलाणी याने सहायक उपनिबंधक अधिकारी कुंदन भोळे यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेतले. लवकरच त्या खासगी सावकरांवर गुन्हा दाखल करून कारवाई केली जाईल, असे आश्वासन देण्यात आले.
इब्राहिम याकूब मुलाणी (वय 35 वर्षे, रा. मौजे उमरगे पागे, ता. पंढरपूर) याने सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात खासगी सावकारांच्या त्रासाला कंटाळून शोले स्टाईल आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात गोंधळ झाला होता. उपस्थित असलेल्या पोलिसांनी मुलाणी या शेतकऱ्याला खाली येण्यासाठी खूप विनंती केली. पण, त्याने नकार देत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा पवित्रा घेतला होता.
सहायक उपनिंबधक अधिकारी कुंदन भोळे यांनी घटनास्थळी धाव घेत संबंधित शेतकऱ्याला आश्वासन दिले. मौजे उमरे पागे या गावातील त्या दोन खासगी सावकाराविरोधात योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले. उपनिबंधक अधिकाऱ्याच्या आश्वासनानंतर इब्राहिम मुलाणी या शेतकऱ्याने खाली उतरण्याचा निर्णय घेतला. प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कुंदन भोळे यांची भेट घेत प्रश्नाचा भडिमार केला. छळ करत असलेल्या त्या दोन खासगी सावकरांविरोधात लवकर कारवाई करावी, अशी मागणी केली.
हेही वाचा - खासगी सावकाराच्या छळास कंटाळून जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकऱ्याचे 'शोले स्टाईल' आंदोलन