सोलापूर: जिल्ह्यातील बार्शी येथील राजेंद्र तुकाराम चव्हाण (वय 58 वर्ष, रा.झाडी बोरगाव, बार्शी ,सोलापूर) या शेतकऱ्याने सोलापूर मार्केट यार्डात 17 फेब्रुवारी 2023 रोजी जवळपास पाचशे किलो कांदा विकला होता. कांद्याचे दर घसरल्याने शेतकऱ्यास प्रतिकिलो 1 रुपया प्रमाणे भाव मिळाला आहे. मोटारभाडे, हमाली, तोलाई याचे पैसे वजा करून फक्त दोन रुपये शिल्लक राहिले होते. मार्केट यार्डातील सुर्या ट्रेडर्स या व्यापाऱ्याने दोन रुपयांचा चेक देत शेतकऱ्याची थट्टा केली आहे.
आत्मदहनाचा दिला इशारा: चेकवर तारीख देखील 8 मार्च 2023 रोजीचा दिल्याने संताप व्यक्त केला जात आहे. शेतकऱ्यास दिलेली पट्टी व चेक सोशल मीडियावर व्हायरल झाली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनी देखील यावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. शेतकरी राजेंद्र चव्हाण यांनी सांगितले की, आम्ही कबाड कष्ट करून, पिकांच उत्पन्न घ्यायव्याचे आणि दर असे घसरत जाऊन, 2 रुपये हातात पडत आहेत. आम्हा शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही तर मुंबईतील मंत्रालयासमोर आत्मदहन करू असा इशारा दिला आहे.
राजू शेट्टीचे ट्विट: राज्यकर्त्यांनो जरा तरी लाज बाळगा, शेतक-यांनी जगायचे कसे हे आता तुम्हीच सांगा? एका बाजूला थकबाकी पोटी शेतक-यांची वीज कनेक्शन धडाधड तोडता. त्यांच्या डोळ्यासमोर पीक करपून जाते. राजेंद्र चव्हाण यांनी सोलापूर बाजार समितीमध्ये १० पोती कांदे विकल्यावर त्याला किती पैसे आले, ते बघा निर्लज्ज व्यापार्याला दोन रूपयांचा चेक देताना लाज कशी वाटली नाही.
2 रुपयांची पट्टी : शेतकरी राजेंद्र चव्हाण यांनी माहिती देताना सांगितले, एकूण 10 पोते कांदा विक्रीसाठी 17 फेब्रुवारी रोजी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आणले होते. यामध्ये 8 पोत्यांचे वजन 402 किलो भरले तर 2 पोत्यांचे वजन 110 किलो भरले होते. कांद्याचे दर घसरल्याने प्रति क्विंटल 100 रुपये प्रमाणे भाव मिळाला. 512 रुपये एकूण रक्कम झाली. हमाली, तोलाई, मोटारभाडे असे एकूण 509 रुपये खर्च झाले होते. 512 रुपयांमधून 509 रुपये वजा केले असता, शिल्लक राहिले फक्त 2 रुपये. नासिर खलिफा (सुर्या ट्रेडर्स) या व्यापाऱ्याच्या दुकानातुन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नियमानुसार 2 रुपयांची पट्टी देण्यात आली. सोशल अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेचे दोन रूपयांचे चेक राजेंद्र चव्हाण या शेतकऱ्याच्या नावे देण्यात आले. चेकवर 8 मार्च 2023 रोजीची तारीख देण्यात आली आहे. दोन रुपयांसाठी शेतकऱ्यास पुन्हा सोलापुरातील मार्केट यार्डात यावे लागणार आहे.
कांद्याचे दर घसरले: सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सुर्या ट्रेडर्सचे मालक नासीर खलिफा यांनी फोन द्वारे माहिती देताना सांगितले, कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात झाली आहे. त्यामुळे दर घसरलेले आहेत.परंतु उत्तम दर्जाच्या कांद्याला आजही चांगला दर आहे. 17 फेब्रुवारी रोजी देखील उत्तम दर्जाच्या कांद्याला उत्तम भाव मिळाला. कांद्यात वेगवेगळे प्रकार असतात, काही खराब कांदे असतात. खराब कांद्याना भाव कमी मिळतो.