सोलापूर Kartiki Ekadashi Mahapuja: आज रविवारी (19 नोव्हेंबर) रोजी सकाळी अकरा वाजता पत्रकार परिषद घेत सकल मराठा समाजातील एका गटानं उपमुख्यमंत्र्यांना कार्तिकी एकादशीला महापूजा येण्यासाठी आम्ही विरोध करणार नसल्याचं सांगितलं. याउलट हा गट उपमुख्यमंत्र्यांचं स्वागत करणार असल्याची भूमिका माजी नगराध्यक्ष नागेश भोसले यांनी मांडली होती. तर लगेच थोड्याच वेळात मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रामभाऊ गायकवाड यांनी उपमुख्यमंत्र्यांना कार्तिकी एकादशीच्या पूजेसाठी विरोध करणार असल्याचं सांगितलं. (division in Maratha community)
दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं स्वागत करू: दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी महापूजेला यावं, एका उपमुख्यमंत्र्यांनी पांडुरंगाची पूजा करावी तर दुसऱ्यानी रुक्मिणीची पूजा करावी. आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं मराठा समाजाच्या वतीनं स्वागत करतो. मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशानेच आम्ही उपमुख्यमंत्र्यांना विरोध करणार नसल्याची भूमिका नागेश भोसले यांच्या गटानं मांडली. शासन मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र आणि आरक्षण देण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यामुळे मराठा समाज हा उपमुख्यमंत्र्यांचं स्वागत करत आहे, अशी भूमिका सकल मराठा समाजातील पदाधिकाऱ्यांनी मांडली. यामध्ये माजी नगराध्यक्ष नागेश भोसले, दीपक वाडेकर, विनोद लटके यांचा समावेश आहे. मात्र, थोड्याच वेळानंतर मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रामभाऊ गायकवाड, किरण घाडगे, संदीप मांडावे, गणेश जाधव यांनी कार्तिकी एकादशीला उपमुख्यमंत्र्यांनी येऊ नये. मराठा समाजाचा त्यांना विरोध असल्याचं त्यांनी सांगितलं.
पूजा वारकऱ्यांच्या उपस्थितीत व्हावी: पंढरपूर तहसील कार्यालय या ठिकाणी मागील 72 दिवसांपासून साखळी उपोषण करणारे गणेश जाधव यांनी हा लढा गरजवंत मराठ्यांचा असल्याचं सांगितलं. सकल मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत तहसील कार्यालय समोरील उपोषण हे सुरूच राहणार. उपमुख्यमंत्र्यांनी सकल मराठा समाजाच्या भावनांचा विचार करून पंढरपूरमध्ये कार्तिकी एकादशीच्या महापूजेला येऊ नये. कार्तिक एकादशीची महापूजा ही वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये पार पाडावी, असं आवाहन करत उपमुख्यमंत्र्यांच्या शासकीय महापूजेला त्यांनी विरोध दर्शवला आहे.
महापूजेला उपमुख्यमंत्री येणार का? एकंदरीतच पंढरपूरमध्ये सकल मराठा समाजामध्ये उपमुख्यमंत्र्यांच्या कार्तिकी एकादशीच्या पूजेवरून फूट पडल्याने कार्तिकी एकादशीच्या शासकीय महापूजेला उपमुख्यमंत्री येणार का? याकडेच सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.
हेही वाचा: