पंढरपूर (सोलापूर) - ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचार तोफा बुधवारी सायंकाळी पाच वाजता थंडावल्या. जिल्ह्यातील निवडणुका होत असलेल्या 658 ग्रामपंचायतींपैकी 54 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून उर्वरित ग्रामपंचयातींसाठी 15 जानेवारीला मतदान तर 18 जानेवारीला मतमोजणी होणार आहे.
22 जानेवारीला सरपंच पदाचे आरक्षण सोडत
ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या 10 दिवसांपासून विविध पॅनेलच्या गटांतर्फे जोरदार प्रचार सुरू होता. 658 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी 21 हजार 32 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. त्यापैकी विविध ग्रामपंचायतींमधून 6 हजार 992 जणांनी अर्ज माघार घेतले आहेत. 6 हजार 301 जागांसाठी 14 हजार 38 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. ग्रामपंचायत निवडणुका चुरशीने होत आहेत. ग्रामपंचायत सरपंचपदाचे आरक्षण 22 जानेवारी रोजी काढण्यात येणार आहे.
ग्रामपंचायत निवडणुक अंतिम टप्प्यात
माळशिरस तालुक्यात 49 गावांचा निवडणूक कार्यक्रम सुरू आहे. तालुक्यातील गोरडवाडी, मिरे, गिरझणी व बाभूळगाव या चार ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. या चार ग्रामपंचायतींच्या 40 व अन्य ग्रामपंचायतींच्या 50 अशा एकूण 90 जागा बिनविरोध झाल्या आहेत. महाळुंग ग्रामपंचायतीसाठी एकही अर्ज दाखल न झाल्याने तेथील 17 जागा रिक्त राहिल्या आहेत. उर्वरित 44 ग्रामपंचायतींच्या 452 जागांसाठी शुक्रवारी मतदान होत आहे. त्यासाठी 913 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. मोहोळ तालुक्यातील 63 ग्रामपंचायतींसाठी येत्या उद्या मतदान होत आहे. तसेच पंढरपूर, बार्शी, करमाळा, सांगोला, मंगळवेढा, माढा या तालुक्यांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीचा रंगली शेवटच्या टप्प्यात आला आहे.
ग्रामपंचायत निवडणूक प्रशासनाची जोरदार तयारी
जिल्ह्यात 657 ग्रामपंचायतींसाठी 2325 केंद्रांवर मतदान होणार आहे. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी कर्मचाऱ्यांची विशेष काळजी घेतली जाणार आहे. प्रत्येक केंद्रावर कर्मचाऱ्यांना मास्क, सॅनिटायझर तर तापमान मोजण्यासाठी टेम्परेचर गन उपलब्ध करून देण्यात येत आहे. 15 जानेवारीला होणाऱ्या मतदानासाठी 18 हजार 533 कर्मचारी नेमले आहेत. 1764 बॅलेट युनिट तर 1803 कंट्रोल युनिट लागणार आहेत. 1570 मेमरी संचाची गरज आहे. यामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी 327, सहायक निवडणूक अधिकारी 597, क्षेत्रीय अधिकारी 125, मतदान केंद्राध्यक्ष 3273, मतदान अधिकारी 3286, सहायक मतदान अधिकारी 6209, शिपाई 3286, इतर अधिकारी 1430 असणार आहेत.
जिल्ह्यातील मातब्बर नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
सोलापूर जिल्हा पहिल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. सोलापूर जिल्ह्यातील बहुसंख्य ग्रामपंचायती या राष्ट्रवादीच्या विविध गटांकडे आहेत त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेससाठी ग्रामपंचायत निवडणूक अतिशय महत्त्वाची झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर काँग्रेस, शिवसेना, भाजप या पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. राष्ट्रवादीतील सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी या निवडणुकीसाठी आपल्या गावांमध्ये तळ ठोकून बसले आहेत. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळिराम साठे यांची वडाळा ग्रामपंचायत तर जिल्हा राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष उमेश पाटील यांची नरखेड ग्रामपंचायत या निवडणुकीला सामोरे जात आहे. माजी आमदार दीपक साळुंके यांनी सांगोला मध्ये लक्ष घातले आहे तर राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे आमदार संजय मामा शिंदे माजी आमदार राजन पाटील यांनी आपल्या गावातील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये बिनविरोध निवड तर तालुक्यातील निवडणूकीत घवघवीत यश मिळण्याची आशा आहे. तर अकलूज ग्रामपंचायतीकडेही राज्याचे लक्ष लागले आहे. त्यात दोन्ही मोहिते-पाटील घराण्याची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मातब्बर नेत्यांची ग्रामपंचायत निवडणुकीच्या संदर्भात प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
हेही वाचा - मुंडे-मलिकांच्या राजीनाम्या बाबत जयंत पाटलांचे मोठे वक्तव्य, म्हणाले...