सोलापूर - कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आल्याने, अक्कलकोट रोडवरील कोंडा नगर येथील एका 65 वर्षीय वृद्ध महिलेस वालचंद कॉलेजमधील मुलांच्या वसतिगृहात क्वारंटाईन केले होते. पण ती वृद्ध महिला 3 दिवसांपासून आजारी होती. त्या वृद्ध महिलेस दोन दिवसांपासून दम येत होता. या महिलेला योग्य वेळी उपचार न मिळाल्याने बुधवारी सकाळी क्वारंटाईन सेंटरमध्येच महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
दरम्यान, वृद्ध महिलेच्या नातेवाईकांनी कोविड सेंटरमध्ये गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यावेळी प्रशासनाला जाग आली. त्यानंतर महानगरपालिका अधिकाऱ्यांची एकच धावपळ उडाली. व घटनेच सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.
कोंडा नगर येथील एका कुटुंबास वालचंद कॉलेजमधील हॉस्टेलमध्ये विलगीकरण कक्षात ठेवले होते. एका पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आल्याने सर्व कुटुंबास क्वारंटाईन व्हावे लागले होते. यामधील त्या वृद्ध महिलेस दम येत होता. कुटुंबातील इतर सदस्यांनी विलगीकरण कक्षाच्या अधिकाऱ्यांना याबद्दल माहिती दिली असता, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.
दरम्यान, बुधवारी सकाळी अधिक दम येऊन या वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. त्यावेळी नातेवाईकांनी संताप व्यक्त करत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर महापालिका अधिकारी वर्गाने वालचंद कॉलेज मधल्या क्वारंटाईन सेंटरला भेट देऊन चौकशीचे आदेश दिले.
गोंधळ वाढल्याने घटनास्थळी नगरसेवक गुरुषांत धातुरगावकर, प्रथमेश कोठे, राजकुमार हांचाटे, विठ्ठल कोटा, राष्ट्रवादीचे संतोष पवार, पोलीस निरीक्षक जफर मोगल, पोलीस उपायुक्त बापू बांगर आदींनी धाव घेतली होती.