सोलापूर - कोरोना विषाणू प्रसाराच्या काळात आघाडीवर राहून काम करणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी राज्य शासनाची प्रतिमा उंचावण्याचे काम केले, असे गौरवोद्गार गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काढले आहेत. सोलापूर येथे कोरोनामुळे मृत झालेल्या पोलिसांच्या कुटुंबास धनादेशाचे वाटप करण्यात आले. आयाजित कार्यक्रमात ते बोलत होते. आरोग्यमंत्री राजेश टोपे, पालकमंत्री दत्ता भरणे हे सुद्धा यावेळी उपस्थित होते.
गृहमंत्री म्हणाले, कोरोनाविरूद्ध जिल्हा प्रशासन, महापालिका, आरोग्य कर्मचारी यांच्याबरोबरीने पोलीस अधिकारी आणि कर्मचारी आघाडीवर लढत आहेत. ही अभिमानाची बाब असून, गेल्या तीन महिन्यातील पोलिसांचे काम सर्वात उत्कृष्ठ आहे. राज्यभरात कोरोनामुळे 58 पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या परिवाराला शासनाची मदत मिळावी म्हणून, 50 लाखांचे सानुग्रह अनुदान, 10 लाख पोलीस महासंचालक सहायता निधी आणि ज्या बँकेत त्यांचे खाते आहे त्या बँकेकडून 5 लाख असे 65 लाख रुपये देण्यात येणार आहे.
जे कर्मचारी मृत्यू पावले आहेत, त्यांच्या कुटुंबीयांना कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीपर्यंत शासकीय निवासस्थानात राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. कोरोनाची लागण झाल्यास पोलिसांना सर्व सोयीसुविधा असणाऱ्या दवाखान्यात उपचारांची सोय करण्यात आली आहे. पोलीस परिवारांच्या पाठिशी शासन खंबीरपणे उभे असल्याची माहिती गृहमंत्र्यांनी यावेळी दिली.
कोरोनामुळे मृत झालेल्या एमायडीसी पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीला यापूर्वीच पोलीस महासंचालक कार्यालयाकडून 10 लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला होता. गृहमंत्र्यांच्या हस्ते त्यांना 50 लाखांचा धनादेस देण्यात आला. तसेच शहर वाहतूक शाखेच्या पोलीस नाईक यांच्या नातेवाईकांना सुद्धा धनादेश देण्यात आला. दोन ग्रामीण पोलीस कर्मचाऱ्याचे प्रस्ताव मात्र प्रंलंबीत आहेत.
यावेळी सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार संजय शिंदे, यशवंत माने, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरूद्ध कांबळे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी, मृत झालेल्या पोलिसांचे कुटुंबिय उपस्थित होते.