सोलापूर - शहरातील प्रतिबंधित क्षेत्रातील ज्येष्ठ नागरिकांना आजपासून मल्टी व्हिटॅमिनच्या गोळ्या देण्यात येत आहेत. सोलापूर महापालिकेच्या वतीने गोळ्या वाटपाची सुरुवात झाली असून आज इंदिरा नगर, हुडको याठिकाणी महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या हस्ते नागरिकांना गोळ्यांचे वाटप करण्यात आले.
गोळ्यांचा कुठलाही दुष्परिणाम होत नसून रक्तदाब आणि मधुमेह आजाराने ग्रासलेले व्यक्ती सुद्धा या गोळ्या घेऊ शकतात. तसेच यामुळे शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होईल, असे महापौर यन्नम म्हणाल्या. तसेच कंटेंटमेंट झोनमधील ज्येष्ठ नागरिक आजारी असतील, तर त्यांनी जवळच्या आरोग्य केंद्रामध्ये किंवा सिव्हिल हॉस्पीटलमध्ये तपासणी करून घ्यावी, असे आवाहन देखील महापौर यांनी केले. यावेळी डॉ. जोशी, झोन अधिकारी रेगळ, ईश्वर खरटमल, आरोग्य सेविका काळे, नीता मोरे, तरुनाम शेख यांच्यासह सर्व आशा वर्कर्सची उपस्थिती होती.