पंढरपूर (सोलापूर) - विठ्ठल दर्शनासाठी ऑनलाईन पासची सक्ती प्रशासनाने केली होती. आता या पासबाबत प्रशासनाने मोठा निर्णय घेतला होता. प्रशासनाने पासची सक्ती रद्द केली असून बुधवारपासून ओळखपत्र दाखवून भाविकांना मुखदर्शनासाठी सोडण्यात आले. यात विठ्ठल-रुक्मिणी मातेचे आठ हजार भाविकांना मुखदर्शन घेता आले.
आठ हजार भाविकांना मुख दर्शन
कोरोनामुळे 17 मार्चपासून राज्यातील इतर मंदिराप्रमाणे पांडूरंगाचे मंदिरही नऊ महिने बंद ठेवण्यात आले होते. दिवाळी पाडव्यापासून कोरोनाचे सर्व नियम पाळून ऑनलाईन पासद्वारे विठ्ठल-रुक्मिणी मातेचे मुखदर्शनाची सोय मंदिर समितीकडून करण्यात आली होती. आधी मुखदर्शनासाठी तीन हजार लोकांना परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर ती पाच हजारपर्यंत वाढवण्यात आली. आता 20 जानेवारीपासून आठ हजार भाविकांना कोणत्याही ऑनलाइन बुकिंग न करता ओळखपत्र दाखवून विठ्ठल रुक्मिणी मातेचे मुखदर्शन घेण्याची परवानगी मिळाली आहे.
65 वर्षे वरील व्यक्तींना दर्शनावर बंदी
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने ऑनलाइन दर्शन पास बुकिंगची अट मंदिर समितीने रद्द केली. त्यामुळे पंढरीमध्ये भाविकांनीही मोठी प्रमाणात गर्दी केली होती. ऑनलाईन पास रद्द झाल्यामुळे विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घडणार या आशेने भाविक दर्शन रांगेत आलेले असतात, ज्या भाविकांचे वय दहा वर्षाच्या पुढील व 65 वर्षाच्या आतील आहे. त्यांना सोडण्यात आले. पण 65 वर्ष वरील व्यक्तींना बंदी असल्याने विठुरायाचे दर्शन घेता आले नाही.
विठ्ठल मंदिर समितीकडून निर्णय
देशभरातील विठ्ठल- रुक्मिणी भक्तांना नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच मंदिर समितीने आनंदाची बातमी दिली होती. मंदिर सुरू होऊन दोन महिने गेले मात्र भाविकाविना मंदिर रिकामे दिसून येत होते. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून 14 जानेवारी रोजी बैठक घेऊन ऑनलाईन पास रद्द करणे व दर्शन घेणाऱ्या भाविक किती संख्या वाढवणे याबाबत विचारविनिमय करून निर्णय घेण्यात आला होता. त्याची अंमलबजावणी 20 जानेवारी रोजी करण्यात आली. अशी माहिती कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली.