सोलापूर - करमाळा तालुक्यातील वाशिंबे येथील एका सामाजिक कार्यकर्त्याला गावात राहायला येवू दिले जात नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राजेंद्र दत्तात्रय कांबळे असे त्या समाजसेवकाचे नाव आहे. मागील चार वर्षापासून त्यांच्या समाजातील काही लोक त्यांना गावात येऊ देत नसल्याची तक्रार त्यांनी प्रशासनाकडे केली आहे. तसेच इच्छा मरणाची परवानगी ही त्यांनी मागितली आहे. मात्र, त्याची दखल घेतली जात नसल्याची खंत त्यांनी माध्यम प्रतिनिधींकडे व्यक्त केली आहे.
कांबळे म्हणाले, या प्रकरणी मी पोलिसात देखील तक्रार केली होती. याबाबत पोलीस निरीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी यांच्याकडे देखील तक्रार केली होती. परंतु याची दखल घेतली गेली नाही. पोलीस अधीक्षक यांच्याकडे इच्छा मरणाची देखील परवानगी मागितली आहे. यामुळे मला विधानसभेचे मतदानदेखील करता आले नसल्याचेही राजेंद्र कांबळे यांनी चॅनलशी बोलताना सांगितले.