सोलापूर : राज्यापेक्षा अधिक असणारा सोलापूरचा मृत्यू दर आता 5.7 टक्क्यांवर येऊन पोहोचला आहे. 10 टक्क्यावरून 5.7 टक्क्यांवर मृत्यूदर आल्याने परिस्थिती नियंत्रणात येत असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. पण मुंबई, ठाणे, पुणे या जिल्ह्यांच्या तुलनेत सोलापुरचा मृत्यूदर आजही अधिकच आहे.
12 एप्रिलरोजी सोलापुरात कोरोनाचा पहिला पॉजिटिव्ह रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर सोलापुरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतच गेली. जून महिन्यात सोलापुरातील लॉकडाऊन उठवण्यात आले. काही नियम व अटी लादून अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली. या अनलॉकच्या प्रक्रियेत रुग्णसंख्या झपाटयाने वाढत गेली. बघता-बघता परिस्थिती नियंत्रणा बाहेर गेली व अवघ्या काही दिवसांच्या आतच कोरोना रुग्णसंख्या 7 हजारच्या वर गेली व मृत झालेल्यांची संख्या 400 च्या वर गेली.
देशात मृत रुग्ण संख्येमध्ये मध्य प्रदेशातील झाशी (10.7 टक्के) पहिल्या क्रमांकावर होते. यानंतर, पंचकुला (10.4 टक्के) व सोलापूर(10 टक्के) असा रेशो होता. वाढत्या मृत्यूदराने सोलापूरचे प्रशासन हतबल झाले होते. सोलापुरातील प्रत्येक रुग्णालयांत कोरोना रुग्ण दाखल होण्याची संख्यादेखील वाढतच चालली होती. त्याअनुषंगाने शेवटी जिल्हा प्रशासनाने 16 जुलैपासून 10 दिवसांचे लॉकडाऊन घोषित केले. या लॉकडाऊनच्या दहा दिवसात प्रशासनाच्या वतीने रॅपिड अँटीजेन चाचणी वाढवून वेळीच उपचार सुरू करण्यात आले, त्यामुळे मृत्यूदर घसरला आहे.
मनपा अधिकारी व आरोग्य खात्यातील अधिकारी म्हणतात, 60 वर्षावरील रुग्ण अधिक मृत झाले आहेत. त्यांना इतरही आजार होते. त्यामूळे त्यांची प्रतिकार शक्ती कमी होती. दहा दिवसांच्या लॉकडाऊननंतर मृत्यूदराचा टक्का घसरला आहे. सोमवारपासून सोलापूर शहरात व आजूबाजूच्या 30 गावांत पुन्हा अनलॉकची प्रक्रिया सुरू होणार आहे. दहा दिवसांत शासनाच्या वतीने रॅपिड अँटीजेन चाचणी वाढवून रुग्ण शोधून काढले आहेत. त्यांवर वेळीच उपचार सुरू करण्यात आले आहे.
दहा दिवसांच्या लॉकडाऊननंतर 27 जुलैपासून सोलापूरमध्ये पुन्हा अनलॉकची प्रक्रिया सुरू होणार आहे. यात सोमवारपासून काय सुरू राहणार काय बंद राहणार याबाबत सांगताना, गर्दीची ठिकाणे जसे भाजी मार्केट येथे विशेष लक्ष देण्यात येईल. एपीएमसी 30 जुलैपर्यंत बंदच राहणार आहे. सोमवारी फक्त अत्यावश्य सेवा, म्हणजे किराणा, भाजीपाला व पेट्रोल पम्प सुरू राहणार आहेत. तर, मंगळवारपासून इतरही दुकाने सुरू होतील, अशी माहिती मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली आहे.