सोलापूर - दहा दिवसांच्या लॉकडाऊननंतर सोमवारपासून (दि. 27 जुलै) सोलापूरमध्ये पुन्हा अनलॉकची प्रक्रिया सुरू होणार आहे. शहरातील संचारबंदी उठणार पण जिल्ह्याच्या सीमेवर नाकाबंदी राहणार आहे. सोलापूर शहराला जोडणाऱ्या महामार्गावर पोलिसांनी नाकाबंदी लावली आहे. तर जिल्ह्यांच्या सीमेवर ग्रामीण पोलिसांची नाकाबंदी आहे. जिल्ह्यात कोणीही प्रवेश करताना त्याची कसून तपासणी केली जात आहे. जिल्हा बाहेरील व्यक्तींना आत प्रवेश देताना होम क्वारंटाईनचा शिक्का मारूनच प्रवेश दिला जात आहे. दहा दिवसांंच्या लॉकडाऊननंतर शहरातील नाकाबंदीमध्ये शिथीलता येणार आहे. मात्र, शहर व जिल्ह्याच्या सीमेवर नाकाबंदी पुढील काही दिवस राहणारच आहे.
पुणे नाका, बार्शी नाका, विजापूर नाका, तुळजापूर नाका, हैदराबाद नाका, देगाव नाका, होटगी नाका, असे नाकाबंदीचे पॉईंट आहेत. इतर जिल्ह्यातून येणाऱ्या वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. तुळजापूर नाका येथील नाकाबंदीच्या ठिकाणी कर्तव्यास असणारे पोलीस उपनिरीक्षक बुरकुले यांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील दहा दिवसांत विविध राज्य व जिल्ह्यातून सोलापुरात प्रवेश करणाऱ्या 2 हजार 862 वाहनांची तपासणी करण्यात आली आहे. त्यातील 185 जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले. एका नाकाबंदी पॉईंटवर 10 पोलीस कर्मचाऱ्यांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. त्यामध्ये एक पोलीस निरीक्षक, एक सहाय्यक पोलीस निरीक्षक, 2 पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हवालदार, पोलीस शिपाई व,होमगार्ड आदी पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात आहेत.
शहरात सात रस्ता, कोंतम चौक, पंजरापोळ चौक, रेल्वे स्थानक, आसरा चौक, विजापूर रोड आदी ठिकाणी शहरातील नाकाबंदी पॉईंट आहेत. येथे देखील पोलिसांनी कडक तपासणी करून विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई केली आहे. सोमवारपासून शहरातील नाकाबंदीमध्ये थोडी शिथिलता येणार आहे. पण, वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाईचा बडगा कायम राहणार आहे. पुढील काळात शहरात विविध चौकात सरप्राईज (अचानक) नाकाबंदी केली जाणार आहे.