सोलापूर - नगरसेवक सुनील कामाटी व त्यासोबत अटक असणाऱ्या अन्य साथीदारांना न्यायालयाने जामीन मंजूर केला असल्याची माहिती अॅड मिलिंद थोबडे यांनी दिली. सोलापुरात ऑगस्ट महिन्यापासून मटका बुकी प्रकरण खूप गाजले होते. त्यामध्ये मुख्य संशयित आरोपी म्हणून सुनील कामाटीच्या नावे जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. गुन्ह्याचे गांभीर्य पाहून हा तपास सोलापूर गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. त्यामध्ये आरोपीच्या वकिलांचे युक्तिवाद ग्राह्य धरून कोर्टाने जामीन मंजूर केला आहे.
जेलरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत न्यू पाच्छा पेठ येथील राजभुलक्ष्मी इमारत (कोंचि कोरर्वी गल्लीत) या ठिकाणी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगताप व त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी दि. 24 ऑगस्ट 2020 रोजी मटका बुकीवर छापा टाकला होता. यामध्ये अनेक आरोपींना अटक झाली होती. या इमारतीमध्ये चालत असलेल्या जुगार अड्ड्याचा सखोल तपास करत गुन्हे शाखेने सुनील कामाटी व त्याची पत्नी सुनीता कामाटी व त्याच्या इतर साथीदारांवर गुन्हा दाखल केला होता. यामध्ये मुख्य संशयित आरोपी सुनील कामाटी व त्यांची पत्नी, इस्माईल मुच्छाले आणि रफिक तोनशाळ यांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एम.एम. बवरे यांनी जामीन मंजूर केला.
सदर गुन्ह्याच्या तपासात मटका व्यवसायातून 307 कोटींचा व्यवहार पोलिसांनी दाखविला होता. नगरसेवक सुनील कामाटी यास दिनांक 23 सप्टेंबर 2020 रोजी पोलिसांनी हैद्राबाद येथून अटक केली होती.चौघांनी वकिलामार्फत जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता. अर्जाच्या सुनावणीच्या वेळेस या गुन्ह्यातील भा.द.वि 420 कलम हे लागू होत नाही. तसेच आरोपी हा नगरसेवक आहे. तो कुठेही पळून जाणार नाही. असे मुद्दे मांडले व ते मुद्दे ग्राह्य धरून न्यायालयाने पंधरा हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला, तर नगरसेवक सुनील कामाटीच्या पत्नी सुनीता कामाटी यांना दिलेला अंतरीम जामीन कायम केला. याप्रकरणी आरोपीतर्फे अॅड. मिलिंद थोबडे, अॅड. विनोद सूर्यवंशी, अॅड. श्रीकांत पवार यांनी काम पाहिले तर सरकारी पक्षातर्फे अॅड. जाधव यांनी काम पाहिले.