सोलापूर : पत्नी, दोन मुलांचा खून करून आत्महत्या करणाऱ्या अमोल जगताप याला व्याजाने पैसे देणाऱ्या नगरसेवकासह दोघांना शहर गुन्हे शाखेच्या पोलीसांनी अटक केली. ही कारवाई आज बुधवार 22 जुलै रोजी झाली. सोलापूर महानगर पालिकेचे विद्यमान नगरसेवक लक्ष्मण यल्लप्पा जाधव ऊर्फ काका आणि समाजसेवक दशरथ मधुकर कसबे या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.
जुना पुणे नाका हांडे प्लॉट येथे राहत असलेला अमोल अशोक जगताप हा सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील कोंडी येथे गॅलेक्सी नावाचे हॉटेल चालवत होता. व्यावसायासाठी त्याने अनेकांकडून व्याजाने पैसे घेतले होते. परंतु व्यवसायामध्ये नुकसान होत होते. त्यामुळे कर्जबाजारी झालेल्या अमोल जगताप याने राहात असलेल्या घरात येवून पत्नी मयुरीसह आदित्य आणि आयुष या दोन मुलांची हत्या करत स्वत:ही गळफास घेवून आत्महत्या केली होती. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यामध्ये त्याने कर्जबाजारी झाल्याने आत्महत्या केल्याचे नमूद केले आणि काही खाजगी सावकारांचे नावे लिहून ठेवली होती.
संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात खळबळ उडवून देणाऱ्या या घटनेनंतर अमोलचा भाऊ राहुल जगताप याने फौजदार चावडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यावरून फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय साळुंखे यांनी तपास करत व्यंकटेश दंबडदिन्नी याला अटक केले होते. त्यानंतर या गुन्ह्याचा तपास शहर गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. यात पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी सिध्दाराम मलप्पा बिराजदार, दिनेशकुमार ऊर्फ बंडू दिलीप बिराजदार, या दोन खाजगी सावकारांना अटक केली. यांनी अमोल जगताप याला 15 लाख 15 टक्के प्रति महिना व्याज दराने देऊन त्याच्याकडून शेतजमीन लिहून घेतल्याचे उघड झाले होते.
दरम्यान या गुन्ह्यात नगरसेवक लक्ष्मण जाधव यांच्यासह अनेकांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलीसांनी नगरसेवक लक्ष्मण जाधव याच्या अटकेसाठी प्रयत्न सुरू केले. परंतु लक्ष्मण जाधव याला याची खबर लागताच तो सोलापूर सोडून पळून जात होता. विजापूरकडे लक्ष्मण जाधव हा जाणार असल्याचे समजल्यावर शहर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगताप आणि त्यांचे पोलीस पथक यांनी सापळा लावून नगरसेवक याला अटक केली आहे. तो कर्नाटकातील धुळखेड येथे दुचाकीवरुन (एमएच 13 बीपी 2830) पळून जात असताना त्याला सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित कुंभार, पोलीस उपनिरीक्षक शैलेश खेडेकर यांनी ताब्यात घेवून झळकी पोलीस ठाण्यात नोंद करुन सोलापूरला अटक करून आणले. लक्ष्मण जाधव याने मोठ्या प्रमाणात अमोल जगताप याला व्याजाने पैसे दिले असल्याचे उघड झाले आहे. त्यानंतर एमपीडीएमध्ये तुरुंगात जाऊन आलेला दशरथ कसबे याचेही नाव या प्रकरणात असल्याने पोलीसांनी त्यालाही अटक केली. त्यानेही मोठ्या प्रमाणात व्याजाने पैसे दिल्याचे उघड झाले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी दिली.