सोलापूर - कोविड 19 च्या नावाखाली महापालिकेचे कर्मचारी व अधिकारी रस्त्यावर डबल सीट जात असलेली दुचाकी वाहने अडवून दंड वसूल करत आहेत. पावती मात्र घन कचरा व्यवस्थापन विभागाची देत आहेत. मास्क वापरला नाही, किंवा सार्वजनिक ठिकाणी थुंकले, अशा पावत्या देत आहेत. ही कारवाई करत असताना महापालिका कर्मचारी व नागरिक यांच्यामध्ये शाब्दिक चकमक होत आहे.
सोमवारी सकाळी शहराच्या काही भागात महापालिका कर्मचाऱ्यांनी अरेरावी केल्याची चर्चा आहे. पोलीस चौकीत चल, शासकीय कामात अडथळा आणतो का, गुन्हा दाखल करू, असे धमकी देत आहेत. घंटा गाडी आणि घन कचरा विभागाचे कर्मचारी डबल सीट असणाऱ्या दुचाकीस्वारांना अडवून दंड आकारत आहेत. विशेष म्हणजे दंड आकारल्यानंतर जी पावती दिली जाते, त्यावर डबल सीट असा उल्लेख न करता मास्क वापरले नाही, किंवा कचरा फेकला, अशा पावत्या देत आहेत. सोलापूर शहराच्या मौलाली चौक, भोजपा टेकडी, विडी घरकुल जवळील गांधी नगर, नई जिंदगी चौक, अमन चौक आदी भागात महापालिकेच्या वतीने ही कारवाई करण्यात आली आहे.
आकारलेला दंड जातो कुठे ?
मग हा जो दंड आकारला जातो, तो नेमका जातो कुठे ? या कर्मचाऱ्यांना दंड वसूल करण्याचा अधिकार आहे का ? अरेरावीची भाषा वापरण्याचा अधिकार यांना कुणी दिला ? असा प्रश्न दुचाकी आणि इतर वाहन धारकांना पडला आहे. महापालिकेने पावती देताना आधी स्वतः नियम पाळावेत, असे नागरिकांचे म्हणणे आहे. अशा प्रकारच्या मनमानी कारभारावर नियंत्रण असावे, अशी मागणी सध्या जोर धरू लागली आहे.
डबल सीट वाहनधारकांवर कारवाई करण्याचा अधिकार कुणाचा असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. कारण एकीकडे पोलीस प्रशासनाची वाहतूक शाखा दुचाकी वाहनांवर कारवाई करत आहे. तर दुसरीकडे महापालिका प्रशासन देखील डबल सीट असलेल्या दुचाकी वाहनांवर कारवाई करत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम पसरला आहे.