सोलापूर - कोरोना विषाणूसमोर प्रशासन देखील हतबल होताना दिसत आहे. सामाजिक संस्थांनी पुढे येऊन कोविड केअर सेंटर उभे करण्यासाठी प्रशासन आणि समाजाची मदत करावी, असे भावनिक आवाहन महानगरपालिकेचे उपायुक्त धनराज पांडे यांनी केले आहे. दिवसेंदिवस परिस्थिती गंभीर होत चालली आहे. त्यामुळे कोविड सेंटर सुरू करणाऱ्या सामाजिक संस्थांना पालिका प्रशासन मान्यता देणार आहे, अशी माहिती महानगरपालिका उपायुक्त धनराज पांडे यांनी दिली.
सर्व उपाययोजना कोरोनासमोर निष्फळ -
सोलापूर शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. हा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी महानगरपालिका आणि जिल्ह्य प्रशासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना व प्रयत्न केले जात आहेत. तरी देखील परिस्थिती आणखी बिघडत आहे. कोरोनासारख्या महामारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पालिकेला लोकसहभाग अवश्यक आहे. म्हणून स्थानिक सामाजिक संस्थांना सहभागी करून घेण्याचा निर्णय मनपाने घेतला आहे.
पहिल्या टप्प्यात तीन सामाजिक संस्था आल्या पुढे -
सेवाभाववृत्तीने शहरातील सामाजिक संस्था संघटना कोविड केअर सेंटर सुरू करू इच्छित असल्यास, अशा संघटनांनी पालिकेशी संपर्क साधावा. योग्य सूचना आणि मार्गदर्शक तत्त्वांसह परवानगी देण्याची व्यवस्था महानगरपालिकेनी केली आहे, अशी माहिती पालिका उपायुक्त धनराज पांडे यांनी दिली. पहिल्या टप्प्यात जैन सोशल गृप, जमाते उलेमा, ग्रामीण पोलीस मुख्यालय आणि शहर पोलीस आयुक्तालयाला कोविड केअर सेंटर उभारण्यास परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती पांडे यांनी दिली.