सोलापूर - सोलापुरात कोरोनाची साथ सुरू झाल्यापासून एकाच दिवशी सर्वाधिक रूग्ण आढळण्याचा विक्रम रविवारी घडला आहे. महापालिका हद्दीत ७२ तर ग्रामीण भागात ४६२ कोरोनाबाधित रूग्ण आढळल्याने जिल्ह्यात एकूण ५३४ कोरोनाबाधितांची भर पडली आहे.
पाचशेपेक्षा अधिक कोरोनाबाधित रुग्ण एकाच दिवशी आढळल्याची घटना पहिल्यांदाच घडली आहे. ग्रामीण भागामधील १३ तर महापालिका हद्दीतील एक अशा एकूण १४ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सोलापुरात एकूण २० हजार ७०४ कोरोनाबाधित रूग्ण झाले आहेत.सोलापुरातील वाढत्या रुग्णसंख्येमुळे मंगळवेढ्यात पुन्हा 'जनता कर्फ्यू' लावण्याची वेळ आली आहे. ग्रामीण भागात माळशिरस, करमाळा, सांगोला, माढा हे कोरोना हॉटस्पॉट होत आहेत.
महापालिका हद्दीतील बाधितांची संख्या ७ हजार ३२ तर ग्रामीण भागातील संख्या १३ हजार ६७२ झाल्याने बाधितांची एकूण संख्या २० हजार ७०४ झाली आहे. आतापर्यंत महापालिका हद्दीतील ४२७ तर ग्रामीण भागातील ३९५ अशा एकूण ८२२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोना चाचणीचे २२४ अहवाल अद्यापही प्रलंबित आहेत. त्यामध्ये महापालिका हद्दीतील ९९ तर ग्रामीण भागातील १२५ अहवालांचा समावेश आहे. ग्रामीण भागातील ९ हजार २९४ तर महापालिका हद्दीतील ५ हजार ८७० असे एकूण १५ हजार १६४ जण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत. रुग्णालयात सध्या ४ हजार ७१८ जणांवर उपचार सुरु आहेत. त्यामध्ये महापालिका हद्दीतील ७३५ तर ग्रामीण भागातील ३ हजार ९८३ रुग्णांचा समावेश आहे.