पंढरपूर - राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. कोरोना प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी राज्यात कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील सर्व सीमा बंद करण्यात आल्या असून, जिल्हाबंदी करण्यात आली आहे. ज्या नागरिकांकडे पास आहे, केवळ अशाच नागरिकांना सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करण्यास मुभा देण्यात आली आहे.
खासगी वाहतूकीला बंदी
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी नियमांचे काटेकोर पालन व्हावे यासाठी सोलापूर जिल्ह्याच्या सीमा बंद केल्या आहेत, जिल्ह्याच्या हद्दीवर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. त्यामुळे पुण्याहून सोलापूरला येणाऱ्य माळशिरस, माढा, सांगोला, करमाळा तालुक्यातील सर्व सीमा बंद करण्यात आल्या असून, अत्यावश्यक सेवा वगळता सर्व प्रकारची खासगी वाहतूक बंद करण्यात आली आहे. तसेच अहमदनगर, बीड, सांगलीसह कर्नाटक राज्यातील खासगी वाहनांवर देखील बंदी घालण्यात आली आहे.
दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी विशेष परवानगीची गरज
सोलापूर जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जाण्यासाठी नागरिकांना पोलिसांच्या माध्यमातून पास सेवा चालू करण्यात आली आहे. त्यासाठी सोलापूर जिल्हा पोलीस प्रशासनाकडून नागरिकांच्या सुविधेसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणीची सोय करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे जवळच्या पोलीस ठाण्यामध्ये ही अर्ज करण्याची सोय करण्यात आली आहे. मात्र काही कारणांसाठीच दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जाण्याची परवानगी असणार आहे. अत्यावश्यक कारणाशिवाय बाहेर जिल्ह्यात किंवा जिल्हांतर्गत प्रवास करण्यास बंदी आहे.
हेही वाचा - नाशिक : ऑक्सिजन एक्सप्रेसद्वारे मिळलेला साठा अर्धा दिवस पुरेल एवढाच