सोलापूर - कोविड १९ च्या वैद्यकीय सेवा सुविधा देण्यास कमी पडणाऱ्या शासन आणि प्रशासन यांच्या निषेधार्थ राष्ट्रीय छावा संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष योगेश पवार यांनी नवी पेठ येथे नग्न आंदोलन केले. त्यांनी आंदोलनावेळी अंगावर ब्लेड, बेड, इंजेक्शन आणि वॅक्सिनचे चित्र काढले होते.
हेही वाचा - डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्पर्शाने पावन झालेली ऐतिहासिक विहिर
एका खासगी जागेत झाले आंदोलन
छावा संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथील गेट समोर आंदोलन करण्याची परवानगी मागितली होती. मात्र, पोलीस प्रशासनाने ही परवानगी नाकारली. शेवटी छावा संघटना खासगी जागेवर आंदोलन करणार असल्याची माहिती या अगोदर देण्यात आली होती. फौजदार चावडी पोलिसांनी योगेश पवार यांना नग्न आंदोलन करताना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे.
सोलापूर शहर आणि जिल्ह्याची लोकसंख्या पाहून वैद्यकीय सुविधा द्याव्या
सोलापूर शहर आणि जिल्ह्याची लोकसंख्या पाहता वैद्यकीय सुविधा अपुऱ्या पडत आहेत. सोलापूर शहर आणि जिल्ह्यात रेमडेसिवीर, ऑक्सिजन आणि रुग्णालयांमध्ये बेडची कमतरता पडली आहे. रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. हा कृत्रिम तुटवडा कमी करण्यासाठी शासकीय समिती स्थापन केली आहे. पण, ही समितीच कोविड रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना डोकेदुखी ठरत आहे, असा आरोप छावा संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष योगेश पवार यांनी केला.
हेही वाचा - लसीकरणाचे राजकारण थांबवा, अशी मागणी करत काँग्रेसचे घंटानाद आंदोलन