पुणे - आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीसह सासू, सासरे आणि नणंद विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. वारंवार होणाऱ्या मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून गुरुवारी तमिळइलाकीया रामकुमार मुनियांडी यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
आरोपी पती रामकुमार याला भोसरी एमआयडीसी पोलिसांनी जेरबंद केले आहे. या घटने प्रकरणी पती एम. रामकुमार (वय-३५ वर्षे, रा. विहार सोसायटी,मोशी प्राधिकरण), सासू एम. सिनीअम्माल ( वय ३६ वर्षे, रा.काडोलोट बोयर स्टिट तामिळनाडू), नणंद एम. रामालक्ष्मी (वय ३६ वर्षे), एम.मुर्गलक्ष्मी (वय २९ वर्षे दोघी रा. तामिळनाडू), अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
मागील ६ वर्षांपासून मृत तमिळइलाकीया रामकुमार मुनियांडी यांचा सासरी मानसिक आणि शारीरिक छळ होत होता. याच जाचाला कंटाळून गुरुवारी पती रामकुमार हा घराच्या बाहेर गेल्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या केली. घरी आल्यानंतर आरोपी पतीने दरवाजा अनेकदा वाजवला. परंतु, आतून प्रतिसाद न मिळाल्याने दरवाजा तोडला. तेव्हा पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले. पत्नीला बेशुद्ध अवस्थेत तातडीने रुग्णालयात घेऊन जाण्यात आले. परंतु, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, सासरी मूळ गाव तामिळनाडू येथे मृतदेह नेल्यानंतर त्याठिकाणी देखील सासर आणि माहेरच्या लोकांत वाद झाले होते. प्रकरण तेथील पोलिसात गेले. तेव्हा, ते आपापसात मिटवण्यात आले होते, अशी माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे. मृताला दोन मुले असून ते वडील अटक असल्याने आणि आई कायमची सोडून गेल्याने आई वडीलांपासून मुले पोरकी झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.