सोलापूर: अपघातात मरण पावलेल्या तीन मृतदेहांवर शवविच्छेदनाची प्रक्रिया सुरू झाली आहे. निखिल रामदास सानप (वय 21 वर्ष,रा. चास, ता. सिन्नर, जि. नाशिक), अनिकेत बाळासाहेब भाबड (वय 22 वर्षे, रा. चास, ता. सिन्नर, जिनाशिक), अथर्व शशिकांत खैरनार (वय 22 वर्षे. रा. चास, ता. सिन्नर, जि. नाशिक) अशी मृतांची नावे आहेत. गणेश नामदेव खैरनार (वय ३२), पंकज रवींद्र खैरनार (वय ३०), जीवन सुदीप ढाकणे (वय २५), तुषार बिडकर (वय २२), दीपक बिडकर (वय २४, रा. चास, ता. सिन्नर जि. नाशिक अशी जखमीं झालेल्याची नावे आहेत. यातील जखमी आणि मयत झालेले तरुण मंगळवारी सकाळी तुळजापूरला (एमएच १५ईएक्स ३२११) या बोलेरो वाहनातून सोलापूर ते तुळजापूरकडे देवीच्या दर्शनासाठी निघाले होते. सोलापूर आणि उस्मानाबादच्या सीमेवर बोलेरो वाहन पलटी होऊन अपघात झाला आहे.
कार वेगात पलटी: मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास भाविकांची बोलेरो सोलापूरहुन तुळजापूरच्या दिशेने निघाली होती. सोलापूर-उस्मानाबाद या दोन जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या कटारे स्पिनिंग मिल जवळ बोलेरो वाहन आले असता अतिशय वेगात असलेल्या बोलेरो वाहनाचे टायर फुटले. त्यामध्ये बोलेरो वाहन तीन ते चार वेळा पलटी होऊन तिघे मृत्यू झाले. जखमींना रुग्णवाहिकेच्या सहाय्याने सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात आणण्यात आले आहे. येथे तपासणी केली असता तीन जणांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तर पाच जखमींवर उपचार सुरू केले. अपघातातील जखमींपैकी तिघांवर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोघांवर खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले.
सोलापुरात यापूर्वीही कार अपघात: सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोटहुन आळंदकडे भरधाव वेगाने निघालेल्या चारचाकी कारची समोरून येणाऱ्या ट्रकला शिरवळजवळ (ता. अक्कलकोट) जोरात धडक बसली. त्यात एकाच कुटुंबातील एका चिमुकलीसह दोन पुरुषांचा जागीच मृत्यू झाला. तर या अपघातात चार जण जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले. ही घटना नोव्हेंबर, 2022 रोजी घडली होती.
स्थळ पाहण्यासाठी जात असताना अपघात: गुलबर्गा (कर्नाटक) जिल्ह्यातील आळंद येथे मुलाला स्थळ पाहण्यासाठी निघाले असता अक्कलकोट जवळील शिरवळ गावाजवळ हा भीषण अपघात झाला होता. इंडी गावातील प्रतिष्ठित असे कुटुंब म्हणून त्यांची ओळख आहे. बुधवारी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला होता. निसार मच्छीवाले अशी त्यांची इंडी गावात ओळख असल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. उमामा लष्करे (वय 3), बशीरा सलगरे (वय 35 ), जुबेर लष्करे (वय 22) व खालिद लष्करे (वय 55) चौघे रा इंडी, जि बिजापूर, कर्नाटक अशी जखमींची नावे आहेत. मृतांची नावे अद्याप समोर आलेली नाहीत.