सोलापूर - शहरामध्ये सध्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे. त्यासाठी राज्य शासनाकडून सोलापूर जिल्ह्यासाठी राखीव इंजेक्शन देण्यात आले आहे. ते राखीव इंजेक्शन ग्रामीण व शहरातील रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांप्रमाणे वाटप करण्यात येत आहे. काही खासगी रुग्णालयांमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शन दिल्यानंतर महापालिकेला इंजेक्शनबाबतची सविस्तर माहिती देत नसल्याचे पुढे आले आहे. रेमडेसिवीर इंजेक्शनबाबत माहिती मिळत नसल्याने मनपा प्रशासनाने एका खासगी रुग्णालयाची तपासणी केली आणि इंजेक्शनबाबतचा काळाबाजार समोर आला आहे.
जुन्या पेशंटच्या नावाने नव्या रेमडेसिवीर मागणी
सोलापूर महानगरपालिका प्रशासनाने शहरातील एका रुग्णालयामध्ये जाऊन तपासणी केली. त्याठिकाणी जुन्या पेशंटच्या नावाने महानगरपालिकेला माहिती देऊन नवीन इंजेक्शन घेतल्याचे प्राथमिक चौकशीत आढळून आले आहे. त्यामुळे रुग्णालयाने गैरवापर केल्यामुळे संबंधीत रुग्णालयावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महानगरपालिका अधिकाऱ्यांनी संबंधीत रुग्णालयाचे नाव जाहीर केले नाही.
शासकीय कार्यालयातून इंजेक्शनचे वाटप
शहरातील व ग्रामीण भागातील खाजगी रुग्णालयांना अन्न व औषध प्रशासन विभागाच्या (एफडीएच्या) माध्यमातून रेमडेसिवीर इंजेक्शन देण्यात येत आहे. त्या रुग्णालयाने त्याची नोंद व्यवस्थित ठेवणे बंधनकारक आहे. कोणत्या रुग्णाला इंजेक्शन कधी दिले आहे. त्याबाबत सर्व अहवाल ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी महापालिकेच्या ऑडिट विभागाला आदेश देण्यात आले आहेत. रुग्णालय प्रशासन रुग्णाला रेमडेसिवीर इंजेक्शन देत आहे का नाही याची तपासणी करण्यात येत आहे.
'रेमडेसिवीर इंजेक्शनचा गैरवापर केल्यास कारवाई'
शहरातील सर्व कोविड रुग्णालयामध्ये रेमडेसिवीर इंजेक्शनचा गैरप्रकार करताना आढळून आल्यास त्यांच्यावर कार्यवाही करण्यात येईल तसेच रुग्णाला व्यवस्थितरित्या तपासणी करून त्यांची काळजी घ्या, असे आवाहन आयुक्त पी. शिवशंकर यांनी केले आहे.
हेही वाचा -आधारविना भटके-विमुक्त लसीकरणापासून वंचित राहणार? मुनींप्रमाणे विमुक्तांसाठी अटी शिथील होणार का?