सोलापूर - महिलांचे प्रश्न हे राजकारणाच्या पलीकडचे असतात आणि ते सोडविण्यासाठी ज्यांनी पुढाकार घेतला त्या भाजप सरकारच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभारले पाहिजे, असे आवाहन भाजप प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केले. सोलापूर शहरातील मयूर मंगल कार्यालय येथे दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार सुभाष देशमुख यांच्या प्रचारार्थ झालेल्या महिला संकल्प मेळाव्यात त्या बोलत होत्या.
हेही वाचा - 'जेव्हा विरोधकांची भाषा घसरते, तेव्हा त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली असते'
तीन तलाक, घराघरात चुलीऐवजी महिलांना गॅस, बचत गटांना व्यवसायासाठी विशेष सवलत अशा अनेक महिला स्वावलंबन व सहकार्याच्या योजना भाजप सरकारने आणल्या. आजतागायत दुर्लक्षित राहिलेले प्रश्न सोडविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सोलापूरचे भाग्यविधाते सुभाष देशमुख कटिबद्ध आहेत, असे त्यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा - राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा शिवसेनेला पाठिंबा; शेकापचा बालेकिल्ला धोक्यात
सुभाष देशमुखांच्या मागे स्त्री शक्तीचा निर्धार करा, आपल्या हाताला काम, समस्यांची सोडवणूक नक्की होणार, असे मत चित्रा वाघ यांनी व्यक्त केले.
पतंजलीच्या सुधा अल्लीमोरे म्हणाल्या, 'भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे', हे म्हणणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला काश्मीरमधील बांधवांच्या हितासाठी घेतलेल्या आर्टिकल ३७० रद्द करण्याच्या निर्णयाचा अभिमान वाटलाच पाहिजे. निधड्या छातीच नेतृत्व आपल्याला मोदीजींच्या रूपाने पंतप्रधान म्हणून मिळाले आहे. त्याचप्रमाणे समाजाच्या गरजा ओळखून सामुदायिक विवाह सोहळा, गोरगरिबांना रोज घरपोच सकस जेवण देणे असे मोलाचे काम सुभाष देशमुख यांनी केले आहे. त्यांच्या पाठीशी आपण सर्वानी खंबीरपणे उभे राहुन त्यांना बहुमताने निवडून देऊ, असे आवाहन केले.