सोलापूर - जिल्ह्याचे पालकमंत्री असतानाही कोरोनावरील उपायायोजनांवर लक्ष दिले नाही. कोरोनाच्या परिस्थितीबाबत विचारले असता अचारसंहितेचे कारण देत जाबाबदारी झटकली. एवढ्यावर न थांबता सोलापूरच्या हक्काचे पाच टीएमसी पाणी उजनी धरणातून इंदापूर (जि. पुणे)कडे वळवत सोलापूरकांना मामा बनविले, अशी टीका करत भाजपचे नगरसेवक सुरेश पाटील यांनी काळे कपडे घालत पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचा निषेध केला. पालकमंत्री बदला आणि काँग्रेसच्या स्थानिक आमदार प्रणिती शिंदे यांना पालकमंत्री करा, अशीही मागणी करण्यात आली.
तातडीने रेमडेसिवीर अन् ऑक्सिजनचा पुरवठा करावा
पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी कोरोना सारख्या भयंकर महामारीत सोलापूरकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले आहे. आचारसंहितेचे कारण समोर करत सोलापूरकरांची थोडीही मदत केली नाही. पालकमंत्र्यांनी ताबडतोब ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन, बेडची व्यवस्था करावी आणि परिस्थिती पूर्वपदावर आणावी, अशी मागणी भाजप नगरसेवक सुरेश पाटील यांनी यावेळी केली.
नियोजनभवन बाहेर पालकमंत्र्यां विरोधात घोषणा
पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचा तीन दिवसांच्या सोलापूर दौरा आहे. पंढरपूर, मंगळवेढा , करमाळा, बार्शी आदी तालुक्याचा दौरा करून रविवारी (दि. 25 एप्रिल) सोलापूर शहरातील नियोजन भवन येथे वरिष्ठ अधिकाऱ्यासोबत बैठक घेतली होती. ही बैठक सुरू असताना नियोजन भवन बाहेर भाजप नगरसेवक सुरेश पाटील यांनी काळा कुर्ता, काळी टोपी परिधान करून घोषणाबाजी करत निषेध केला. विजापूर नाका पोलिसांनी ताबडतोब सुरेश पाटील यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्याला नेले.
हेही वाचा - उजनी धरणाच्या पाण्यावरून राजकारण तापले, उजनीतून इंदापूरला पाणी सोडण्यास विरोध
हेही वाचा - कोरोनाचा फैलाव सुरूच; शनिवारी वाढले 1723 बाधित रुग्ण