पंढरपूर : राज्यामध्ये सध्या थकित वीज बिलाचा मुद्दा पेटला आहे. त्यातच महावितरण कंपनीकडून सक्तीची वसुली सुरु करण्यात आली आहे. महावितरणकडून थकित बिल असणाऱ्या शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरू आहे. यामुळे शेतकरी संघटनांचे विविध पक्ष आक्रमक झाले आहे. त्यातच पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज (रविवार) पंढरपूर दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजितदादा यांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा जनहित शेतकरी संघटना व भाजपाकडून देण्यात आला आहे
सोलापूर जिल्ह्यामध्ये वीज बिल प्रश्नी विविध राजकीय पक्षांचे आंदोलन..
नुकत्याच झालेल्या विधिमंडळामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळ कामकाज सुरू असताना वीज तोडणी थांबण्याचे आदेश दिले होत. मात्र विधीमंडळाच्या शेवटच्या दिवशी पवार यांनी वीज वितरण कंपनीला शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचे वीज बिल भरून घेण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे वीज वितरण कंपनीचे अधिकारी व शेतकऱ्यांमध्ये मोठा संघर्ष निर्माण झाला आहे. त्यातच वीज बिल वसुलीवरुन राज्यातील प्रमुख पक्षांनी आंदोलने केली आहे. सक्तीने वीज वसुली बंद करा, अशी मागणी प्रमुख राजकीय पक्षांनी केले आहे. त्याचे पडसाद सोलापूर जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात उमटताना दिसत आहेत.
अजित दादा पवार यांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा..
पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीसाठी 17 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्यानिमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे पंढरपूर दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात पवार यांना बळीराजा शेतकरी संघटना व भाजप कार्यकर्त्यांकडून काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देण्यात आला आहे. पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुकीमध्ये वीज बिल हा कळीचा मुद्दा बनणार असल्याचे दिसून येत आहेत. भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी अजित पवार यांच्या पंढरपूर दौऱ्याला विरोध केला आहे. अजित दादा पवार यांनी वीज बिलाबाबत योग्य तो निर्णय घ्यावा त्यानंतर पंढरपुरात यावे, अन्यथा भाजप कार्यकर्त्यांकडून काळे झेंडे दाखवण्यात येतील असा इशारा देण्यात आला आहे.