सोलापूर - सोलापूर शहर मध्य मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवाराने चक्क घोड्यावरून रॅली काढत उमेदवारी अर्ज दाखल केला. लेबर पार्टीचे बशीर अहमद शेख यांनी घोड्यावर येऊन उमेदवारी अर्ज दाखल केला. तर घोड्यावर बसून काढलेली ही मिरवणूक आता कायद्याच्या कचाटीत सापडण्याची शक्यता आहे. कारण निवडणुकीत आणि प्रचारात कोणत्याही प्राण्यांच्या वापरावर बंदी आहे. त्यामुळे शेख यांच्या विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरू झाली आहे.
हेही वाचा - करमाळा विधानसभेसाठी शिवसेनेकडून रश्मी बागल यांना उमेदवारी
बशीर अहमद शेख यांनी मंगळवारी दुपारी उमेदवारी अर्ज दाखल केला. या मिरवणुकीबाबत बशीर यांच्याकडे विचारणा केल्यास, ते म्हणाले की, मला डोळ्यांचा आणि मधुमेहाचा त्रास आहे. प्रकृती अस्वस्थ्येमुळे मी चालू शकत नाही. त्यासाठी माझ्या कार्यकर्त्यांनी घोड्यावरून मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी मी पोलिसांकडे परवानगी मागितली होती, पोलिसांनी मला सकारात्मक प्रतिसादही दिला. त्यामुळे मिरवणूक काढली असल्याचे शेख यांनी सांगितले.
हेही वाचा - 'कमळ' हाती घेता घेता, आमदार भारत भालकेंनी हातात बांधले 'घड्याळ'
तर निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार निवडणुकांच्या प्रचारामध्ये प्राण्यांचा वापर करता येऊ शकत नाही. जर अशा प्रकारे कोणी प्राण्यांचा वापर करत असेल, तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश आयोगातर्फे देण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.