सोलापूर - कोरोनाच्या प्रतिबंधासाठी सोलापुरातील बालाजी उद्योगसमूहाने 85 लाख रुपयांची मदत आज जाहीर केली. यापैकी मुख्यमंत्री सहायता निधीस 50 लाख, पीएम केअर्स निधीला 25 लाख तर तेलंगणा राज्य शासनाला 10 लाख रुपयांची मदत आज जाहीर केली. मदतीचा धनादेश बालाजी उद्योग समूहाचे संचालक राम रेड्डी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सुपूर्द केला आहे.
बालाजी उद्योग समुहाचे प्रमुख राम रेड्डी आणि एन. राजेश्वर रेड्डी यांनी आज पन्नास आणि पंचवीस लाख रुपयांचे धनादेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे सुपुर्द केले. तेलंगणा शासनाला ऑनलाईन पैसे पाठवण्यात आल्याचे, रेड्डी यांनी सांगितले. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख, जिल्हा प्रशासन अधिकारी पंकज जावळे आदी उपस्थित होते.
बालाजी उद्योग समूह औषध आणि खते निर्मिती याचबरोबर हॉटेल व्यवसायात कार्यरत आहेत. या समुहामार्फत सीएसआर निधीमधून विविध लोकोपयोगी उपक्रम राबविले जातात. बालाजी उद्योग समूहाचे प्रमुख राम रेड्डी हे मुळचे तेलगंणातील आहेत. मात्र, व्यवसायासाठी ते सोलापूरात येऊन सोलापूरकर आणि पर्यायाने महाराष्ट्रीयन झालेले आहेत. आपण समाजाचे काही तरी देणे लागतो हे कायम लक्षात ठेऊन राम रेड्डी यांच्याकडून सामाजिक काम केले जाते. विशेष बाब म्हणजे त्यांनी केलेले सामाजिक काम हे चिरंतन टिकणारे असे आहे. याच रेड्डी यांच्या बालाजी उद्योग समूहाकडून 85 लाख रूपये हे कोरोनाच्या लढ्यासाठी दिले आहेत.
हेही वाचा - कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी 'प्रीसिजन'कडून एक कोटी