सोलापूर - प्रजासत्ताक दिनी पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या हस्ते जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. बॅडमिंटन प्रशिक्षक सुनील देवांग यांना गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्काराने गौरवण्यात आले.
देवांग यांच्या बरोबरच राजेंद्र नारायणकर यांना आणि हरिदास रणदिवे यांना क्रीडा संघटक म्हणून पुरस्कार देण्यात आला. इतर पुरस्कार गुणवंत विजेते खेळाडूमध्ये आकांक्षा रमेश शिरसट (धनुर्विद्या), वसंत दामाजी सरवदे (कुस्ती), राहुल सुरेश हजारे (हँडबॉल), निहाल सुनील गिराम (जलतरण -ड्रायव्हिंग), बिल्बा अनिल गिराम (जलतरण- ड्रायव्हिंग), दत्तात्रय केशव वरकड (मैदानी खेळ) यांचाही पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, महापालिका आयुक्त दीपक तावरे आणि पोलीस अधिक्षक मनोज पाटील तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
दहा हजार रुपये रोख, प्रशस्तीपत्र आणि मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीने सुनिल देवांग यांची या पुरस्कारासाठी निवड केली होती. देवांग गेल्या 25 वर्षांपासून बँडमिंटनचे प्रशिक्षण देत आहेत.