पंढरपूर (सोलापूर) - पांडुरंगाचे शेकडो वर्षांची परंपरा असणाऱ्या गेल्या वर्षीप्रमाणे याहीवर्षी राज्य शासनाकडून कोरोना प्रादुर्भावामुळे पायी वारीस परवानगी नाकारण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी देहू, आळंदी यांना आषाढी सोडण्यासाठी एसटी बसद्वारे शंभर वारकऱ्यांना परवानगी देण्यात आली आहे तर उर्वरित आठ पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी पन्नास वारकऱ्यांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र राज्य सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात पंढरपूर येथील मानाच्या पालखी सोहळ्याच्या प्रमुख महाराज मंडळी नाराजी व्यक्त केली आहे. राज्य सरकारने आषाढी वाढीबाबत पुनर्विचार करावा, अशी मागणी महाराज मंडळींकडून होत आहे.
येत्या 20 जुलैला पंढरपूर येथे आषाढी एकादशी सोहळा पार पडणार आहे. त्यासाठी आळंदी व देहू या पालखी सोहळ्यासाठी राज्य शासनाने बायो बबल या पद्धतीने पायी वारी चालवण्याची परवानगी महाराज मंडळींनी मागणी केली होती. त्यामध्ये प्रत्येक संस्थांच्या मर्यादित वारकरी मंडळींना पायी वारीमध्ये सहभागी होण्याची परवानगी घ्यावी, राज्य शासन जे कोरोना नियम ठरवून दिले त्याप्रमाणे पायी वारी केली जाईल, असे आश्वासन भक्त मंडळींकडून देण्यात आले होते. मात्र राज्य शासनाकडून गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी वारकरी मंडळींची संख्या वाढवली आहे व त्यांना आणण्यासाठी एसटी बसची संख्या वाढवली आहे. मात्र महाराज मंडळी पायी वारी परवानगी घ्यावी अशी मागणी केली होती. गेल्या दोन वर्षापासून वारी परंपरेला खंड पडत आहे. त्यामुळे महाराज मंडळींनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
राज्य शासनाकडून वारकरी संप्रदायावर अन्याय -
पांडुरंगाचा वारकरी संप्रदाय हा शांतीचा संप्रदाय आहे. त्यामुळे गेल्या वर्षी प्रमाणे यावर्षी एसटी बसमधून पालखी सोहळा न आणता त्याला पायी वारीची परवानगी घ्यावी, अशी मांडणी केली होती. मात्र जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी जो अहवाल दिला आहे. त्याप्रमाणे राज्य शासनाकडून पायी दिंडीला परवानगी नाकारण्यात आली आहे. राज्य सरकारने घेतलेला हा निर्णय दुर्दैवी आहे. राज्यशासनाकडून वारकरी संप्रदायावर अन्याय होत आहे. वारकरी संप्रदाय हा सहिष्णू जरी असला, तरी अन्याय सहन करणार नाही, असा इशारा रामकृष्ण वीर महाराज यांनी राज्य सरकारला दिला आहे.
मानाच्या पालखी सोहळ्याचे प्रमुख राणा महाराज वासकर यांचा बोलण्यास नकार -
संत ज्ञानेश्वर पालखी सोहळ्याचे प्रमुख वासकर महाराज यांनी राज्य शासनाने दिलेल्या प्रातिनिधिक स्वरूपाच्या वारीबाबत माध्यम प्रतिनिधीशी बोलण्यास नकार दिला आहे. वाखरी येथील रिंगण सोहळ्यानंतर वासकर महाराज यांना पादुका देऊन वाखरी ते पंढरपूर पायी दिंडी करत असताना मान दिला जातो. मात्र सलग दोन वर्षांमध्ये आषाढी वारी सोहळा हा प्रातिनिधिक स्वरूपाचा होत असल्यामुळे वासकर महाराज यांनी याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. वासकर महाराज यांनी अशाप्रकारे मौन बाळगले आहे. वारकरी संप्रदाय मध्ये काय निर्णय घेणार याची उत्सुकता लागली आहे.