सोलापूर - आशा वर्कर आणि गट प्रवर्तक यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. 16 जून पासून सोलापूर जिल्ह्यात आशा वर्कर आणि गट प्रवर्तक यांनी बेमुदत संप पुकारला आहे. आज सोमवारी संपात सहभागी असलेल्या आशा वर्कर आणि गट प्रवर्तकांचा मोठा मोर्चा सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालवर धडकला. तब्बल दोन तास ठिय्या दिल्याने पोलिसांची एकच तारांबळ उडाली होती. जिल्हाधिकारी कार्यालसमोर जाणारा रस्ता या आंदोलनामुळे पूर्णपणे बंद करण्यात आला होता. आशा वर्कर आणि गट प्रवर्तक यांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन देण्यात यावे अशी मागणी केली.
सोलापूर जिल्ह्यात ग्रामीण भागात आशा वर्कर आणि गट प्रवर्तक यांनी कोरोना सेवा करण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. आता तिसरी लाट येण्याची शक्यता वैद्यकीय तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. यासाठी पूर्व उपाययोजना जिल्हा प्रशासनाच्यावतीने केल्या जात आहेत. पण ऐनवेळी ग्रामीण भागातील आशा वर्कर आणि गट प्रवर्तक यांनी काम बंद आंदोलन केल्यामुळे, गेल्या सहा दिवसांपासून कोरोना सर्व्हे, तपासणी किंवा लसीकरण कामकाजाचा खोळंबा झाला आहे. आज सोमवारी विविध मागण्या करत जिल्ह्यात काम करणाऱ्या आशा वर्करने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा आयोजित केला होता.
आशा वर्करच्या मागण्या
1) आशा वर्कर आणि गट प्रवर्तक यांना शासकीय सेवेत सामावून घ्या
2) आशा वर्कर यांना 18 हजार रुपये आणि गट प्रवर्तक यांना 22 हजार रुपये किमान वेतन द्यावे.
3) आरोग्य विभागातील रिक्त पदांमध्ये 50 टक्के आरक्षण मिळावे.
4) कोरोनाबाधित झाल्यावर खाजगी दवाखान्यातून उपचार घेतल्यावर, आशा वर्कर आणि गट प्रवर्तक यांना वैद्यकीय बिलाची रक्कम परत मिळावी
5) इतर आरोग्य कर्मचाऱ्यांप्रमाणे जोखीम भत्ता मिळावा.
6) आशा वर्कर आणि गट प्रवर्तक यांच्या कुटुंबाला मेडिक्लेम मिळावा.
7) कोणतेही काम विना मोबदला लावू नये.
8) आशा वर्कर आणि गट प्रवर्तक यांना सन्मानाची वागणूक मिळावी.
9) गट प्रवर्तकांचे 11 महिन्यांचे करारपत्र बंद करून कायम नियुक्तीचे पत्र द्यावे.
10) राष्ट्रीय मोहिमेमध्ये गट प्रवर्तकांना प्रसूती मेडिकल रजा मिळावी.