पंढरपूर (सोलापूर)- मृत्यूनंतर वैर संपते म्हणतात. मात्र गलिच्छ राजकारणात कोणतेच गृहितक खरे ठरवणे चुकीचे ठरू शकते. असाचा एक प्रकार माळशिरस तालुक्यात समोर आला आहे. गावगाड्यातील राजकारणाचे भयानक चित्र माळशिरस तालुक्यातील माळेवाडी या गावात पाहायला मिळाले आहे. माळशिरस तालुक्यातील माळेवडी येथे पूर्ववैमनस्यातून एका अंध मागासवर्गीय व्यक्तीचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी स्मशानात नेण्यास रस्ता न दिल्याचे प्रकरण घडले. त्यानंतर त्या मृताच्या नातेवाईंकांनी गावाच्या ग्रामपंचायत कार्यालयासमोरच मृतदेहावर अंत्यसंस्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अकलूज पोलीस ठाण्यांमध्ये तेरा जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
ग्रामपंचायत समोर अंतिम विधी उरकला
माळशिरस तालुक्यातील माळवाडी येथील धनाजी साठे यांचे शुक्रवारी पहाटेच्या सुमारास निधन झाले होते. ते जन्मजात अंध होते. त्यानंतर साठे कुटुंबाकडून अंत्यसंस्काराची तयारी करण्यात आली. माळेवाडी येथे स्मशानभूमी नसल्यामुळे बोरगाव येथील स्मशानभूमी मध्ये धनाजी साठे यांचा अंत्यसंस्कार विधी करण्यासाठी तयारी करण्यात आली. मात्र गावातील काही मंडळींनी स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावर अडवणूक केल्याचा आरोप साठे कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे.
18 तास मृतदेह ठेवला ताठकळत-
साठे कुटुंबीयांनी 18 तास मृतदेह बोरगाव येथील स्मशानभूमीकेड जाणाऱ्या रस्त्यावरच ठेवला असल्याचा दावा कुटुंबाकडून करण्यात आला. अखेर साठे कुटुंबाने मृतदेहावर अकलूज येथे अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला. तेथून अकलूजकडे निघाले असता, पुन्हा पोलिसांकडून अडवणूक झाल्याचा गंभीर आरोप साठे कुटुंबाने केला आहे. अखेर कोणताच मार्ग न उरल्याने मृतदेहाची होत असलेली विटंबना थांबवून त्यांनी माळेगावातील ग्रामपंचायती समोरच मृतदेहावर अंत्यसंस्कार केले.
अकलूज पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल-
गाव पातळीवरील राजकारणातील प्रकरणांमध्ये साठे कुटुंबीयांकडून यापूर्वी दोन ॲट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र त्याचा तपास योग्य दिशेने होत नसल्याचा आरोप कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे. मालेवाडी गावातील झालेला प्रकार हा पुरोगामी महाराष्ट्राला लाजिरवाणा असल्याचे दिसून येत आहे, या प्रकरणी साठे कुटुंबीयांकडून गावातील 13 जणांविरोधात ॲट्रॉसिटी गुन्हा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तर ग्रामपंचायत कार्यालयासमोर अंत्यसंस्कार करणाऱ्या साठे कुटुंबावरही अकलूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांनी दिली आहे.