पंढरपूर - माळशिरस तालुक्यातील अकलूज येथे रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार सुरू आहे. अकलूज येथे पाच मे रोजी इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या तिघा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. अकलूज पोलिसांनी दोन दिवसांमध्ये इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या सात जणांना अटक केली आहे. त्यामुळे इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश होणार असल्याची माहिती अकलूज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरुण सुरेगावकर यांनी दिली आहे.
पोलिसांकडून सात जणांना अटक...
पोलीस निरीक्षक अरुण सुरेगावकर यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार रेमडेसिवीर इंजेक्शनची अवैध विक्री करणाऱ्या तिघांना अटक करण्यात आले. सहा मे रोजी अकलूज पोलिसांनी कारवाई केल्यानंतर अजून 4 जणांना अटक करण्यात आली. 5 मेच्या कारवाईमध्ये अण्णासाहेब सुग्रीव किर्दकर (वय २८, रा चाकाटी लाखेवाडी, ता. इंदापूर, जि. पुणे), अजय महादेव जाधव (वय २३ वर्षे), कुमार महादेव जाधव (वय २१, दोघे रा. संग्रामनगर, ता. माळशिरस) यांनी अशी अटक केली. तर 6 मे रोजी केलेल्या कारवाईत योगेश दिलीप शिंदे (रा. नवी ग्रामपंचायत, अकलूज), सागर थोरात (आजाद चौक, अकलूज), जाननिसार मिरज मुलाणी (राऊत नगर, अकलूज) अशा सहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. तर पाच मे रोजी झालेल्या कारवाईत अजून एकाला अटक करण्यात आली आहे. यांच्याविरोधात औषध निरीक्षक नामदेव भालेराव यांनी फिर्याद दिली आहे.
अकलूज येथे इंजेक्शनचा काळाबाजार...
पोलिसांनी आरोपीकडे रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी करण्यासाठी डमी ग्राहक पाठवले होते. आरोपींकडे कोणत्याही प्रकारचा परवाना नसतानाही बेकायदेशीररित्या रेमडेसिवीर इंजेक्शन 35 हजार रुपयांना विकत असल्याचे आढळून आले. त्याचबरोबर वैद्यकीय अधिकाऱ्याची चिठ्ठी आणि कोविड तपासणी अहवालाशिवाय अधिक किंमतीने इंजेक्शनची विक्री करत होते. हे आरोपी अकलूज येथील १०० फुटी बायपास रोडवरील अभय क्लिनीकजवळ विक्री करुन शासनाची फसवणूक करत होते. त्यानंतर पोलिसांकडून तिघांना अटक करण्यात आली आहे. सहा मे रोजी अकलूज येथील जुना एसटी स्टँड परिसरात रेमडेसिवीर इंजेक्शनची विक्री करत असल्याची पोलिसांना माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी औषध निरीक्षक भालेराव व दोन पंचासह सापळा रचून डमी ग्राहक पाठवून दिले. आरोपींकडून रेमडेसिवीर इंजेक्शन साठा जप्त करण्यात आला. परवाना नसतानाही वाजवी दरापेक्षा जास्त दराने विक्री करणाऱ्या दिग्गजांना अकलूज पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरेगावकर करत आहे.