सोलापूर - शहरातील होटगी रस्त्यावरील विमानतळावरून विमानसेवा सुरू करावी, या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने अनोखे आंदोलन करण्यात आले. सोलापूरच्या गड्डा यात्रेत मिळणारी प्लास्टिकची खेळण्यातील विमाने हातात घेऊन विमानतळाच्या बाहेर संभाजी ब्रिगेडने आंदोलन केले. सोलापूरच्या औद्योगिक विकासासाठी विमानसेवा सुरू होणे गरजेचे असल्याचे संभाजी ब्रिगेडने म्हटले आहे.
केंद्र सरकारच्या 'उडान' योजनेमध्ये सोलापूरचा समावेश असला तरी प्रत्यक्षात सोलापुरातून विमानच उडालेले नाही. विमानतळाच्या बाजूला असलेली साखर कारखान्याची चिमणी अडसर असल्याचे विमानतळ प्राधिकरणाकडून सांगण्यात येते. त्यामुळे येथुन कायमस्वरूपीची विमानसेवा अद्याप सुरू करण्यात आलेली नाही.
हेही वाचा - माढ्यात दोन ठिकाणी दरोडा, गळ्याला चाकू लावून टाकला दरोडा
सोलापुरातील विमानसेवा आणि साखर कारखान्याची चिमणी या विषयावरून मोठे राजकीय वादंग देखील झाले. त्यानंतर विमानतळ आणि साखर कारखान्याची चिमणी हा विषय उच्च न्यायालयापर्यंत गेला आणि चिमणी पाडण्याचे आदेश देण्यात आले, असे असताना देखील अजूनही चिमणी पाडलेली नाही आणि विमानसेवा देखील सुरू झालेली नाही.
या सर्व पार्श्वभूमीवर विमानसेवा सुरू करण्याच्या मागणीसाठी आज सोलापूर विमानतळावर संभाजी ब्रिगेडच्या वतीने खेळण्यातील विमाने हातात घेऊन आंदोलन करण्यात आले. सोलापुरात विमानसेवेसाठी पोषक वातावरण आहे. व्यापारी, उद्योजक वरिष्ठ शासकीय व निमशासकीय अधिकाऱ्यांसाठी विमानसेवा उपलब्ध होणे आवश्यक आहे. त्यामुळे सोलापुरातून लवकरात लवकर विमानसेवा सुरू होणे गरजेचे आहे.
हेही वाचा - माघवारी पालखी सोहळ्यातील अश्वाचे पूजन, ३१ जानेवारीला रिंगण सोहळ्याचे आयोजन
केंद्र शासनाने सोलापूर शहर 'स्मार्ट सिटी' म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे या शहरामध्ये विमानसेवा असणे अत्यावश्यक आहे. पण येथील राजकीय अनस्थेमुळे व गलिच्छ राजकारणाचा फटका विमानसेवा सुरू होण्यास बसत आहे. सोलापुरात विमानसेवा सुरू झाली, तरच उद्योग व्यवसाय सोलापूर शहरात येतील. त्यामुळे सोलापुरातील बेरोजगारी कमी होण्यास मदत होईल. माननीय उच्च न्यायालयाने सोलापुरातील विमानसेवा सुरू होण्यासंदर्भात ज्या काही तांत्रिक अडचणी आहेत, त्या तत्काळ दूर करण्याचे आदेश देऊन सुद्धा महानगरपालिका प्रशासन व जिल्हा प्रशासन जाणून-बुजून कारवाई करण्यास टाळाटाळ करीत आहे. याचा फटका सोलापुरातील नागरिकांना व उद्योगधंद्यांना बसत आहे. त्यामुळे सोलापूर विमानतळावरून तत्काळ विमानसेवा सुरू करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष शाम कदम यांनी केली.