सोलापूर - सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची बदली होऊन १८ दिवस पूर्ण झाले आहेत. मात्र अद्याप नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली नाही. या पदासाठी विविध नावांची चर्चा सुरू आहे. पण अद्याप कोणत्याही नावावर शिक्कामोर्तब झालेला नाही.
दोन वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर सोलापूरचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची अहमदनगर येथे पोलीस अधीक्षक म्हणून बदली झाली. मराठा आंदोलनानंतर मनोज पाटील यांनी सोलापूरच्या पोलीस अधीक्षकपदाचा पदभार अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्याकडे सोपवला. त्यानंतर त्यांनी ग्रामीण पोलीस दलाचा निरोप घेऊन अहमदनगर येथील पोलीस अधीक्षकपदाची सूत्रे स्वीकारली. मात्र अद्याप सोलापूर पोलीस अधीक्षकाचे पद रिक्तच आहे.
दोन दिवसांत नवीन अधीक्षक मिळण्याची शक्यता -
राज्य शासनाने गेल्या दीड महिन्यापासून अधिकाऱ्याच्या बदल्याचे सत्र सुरू केले आहे. त्यात सोलापूर जिल्ह्याचे अधीक्षक मनोज पाटील यांची १८ दिवसांपूर्वी नगर जिल्ह्यात बदली झाली आहे. आता नव्या पोलीस अधीक्षकांच्या नियुक्तीबाबत गृहविभागाकडून पुढील दोन दिवसांमध्ये आर्डर निघण्याची शक्यता वर्तवली जात आहे. लातूरचे राजेंद्र माने, सातारा येथील तेजस्विनी सातपुते, तुषार जोशी यांच्या नावाची चर्चा आहे.