सोलापूर - इंधन दरवाढी विरोधात आम आदमी पार्टी(आप)च्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. पेट्रोलचे दर प्रती लिटर 90 रुपयांपेक्षाही अधिक झाले आहेत तर, डिझेलचे दर 75 रुपयांच्या वर गेले आहेत. त्या विरोधात आज गुरुवारी सकाळी सायकलवर बसून आपने केंद्र सरकारचा निषेध केला.
कच्च्या तेलाचे भाव कमी असताना देखील पेट्रोल दरवाढ -
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत क्रूड ऑइल(कच्चे तेल)चे भाव कमी आहेत. तरी देखील केंद्र सरकार वेगवेगळे कर लावून पेट्रोल आणि डिझेल दरवाढ करत आहे. 2014मध्ये केंद्र सरकार पहिल्यांदा सत्तेवर आले होते. त्यावेळी क्रूड ऑइल 110 डॉलर प्रति बॅरल होते. तेव्हा भारतात पेट्रोल 71 रुपये प्रति लिटर होते. सध्या क्रूड ऑइल 39 डॉलर प्रति बॅरल आहे. तरी, देखील देशात पेट्रोल 91 रुपये प्रति लिटर आहे.
वेगवेगळ्या करांमुळे दरवाढ -
'जीएसटी'ही करव्यवस्था लागू होताना, केंद्र सरकारने 'एक देश, एक कर' ही संकल्पना राबवत असल्याचा डंका वाजवला होता. प्रत्यक्षात मात्र, पेट्रोल व डिझेलवर वेगवेगळे लावले जात आहेत. असा विरोधाभार का? असा प्रश्न आम आदमी पार्टीच्या नेत्यांनी माध्यमांशी बोलताना उपस्थित केला.
पेट्रोलवर 28 टक्के जीएसटी कर लावावा -
केंद्र सरकार पेट्रोलियम पदार्थांवर वेगवेगळे 69 टक्के कर लावून सर्वसामान्य नागरिकांकडून पैसे वसुल करत आहे. पेट्रोलियम पदार्थांवर 28 टक्के जीएसटी लावला तर पेट्रोल व डिझेलचे दर खूप कमी होतील, अशी मागणी आम आदमीचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली.