माढा (सोलापूर) - "रुपाची खाण...दिसते छान..शांताबाई.."हे गाणे मागच्या काही वर्षांत महाराष्ट्रात चांगलेच गाजले होते. मात्र ग्रामीण भागातील एका शांताबाईची विदारक अवस्था समोर आली आहे.पोटाची खळगी भरण्यासाठी गोरगरिब निराधारांना प्रचंड यातना सहन कराव्या लागतात याचीच प्रचिती या शांताबाईंकडे पाहिल्यावर येते. माढा तालुक्यातील उपळाई (खुर्द) गावातील ७५ वर्षीय निराधार शांताबाई कदम या आजीबाईंना पोट भरण्यासाठी राज्य मार्गावरुन पायपिट करावी लागत आहे. फायबर खुर्चीलाच वाॅकर बनवून त्या हाल अपेष्टा सहन करीत भुकेच्या यातनेने राज्य मार्गावरुन भटकत आहेत. दोन वेळचे जेवण, चालण्यासाठी लागणारा वाॅकर आणि अन्य आवश्यक मदत करावी, अशी मागणी त्या करत आहेत.
शांताबाई रेल्वेत कला सादर करुन प्रवाशांकडून पैसै आणी खाद्य जमा करून भूक भागवत होत्या. मात्र गेल्या वर्षापासून लाॅकडाऊनमुळे सर्व काही ठप्प झाले. रेल्वे बंद झाल्या आणि त्याच्या उपळाई या मुळ गावी आल्या. एकदा घरासमोरुन रस्त्यावर चालत असताना पाय घसरून पडल्या. पायाला इजा झाल्याने दिव्यांग झाल्या. गेल्या वर्षभरापासुन त्यांची पोटाची खळगी भरण्यासाठी लढाई सुरू आहे. कानाने ऐकू येत नसल्याने अन् पायाने दिव्यांग असूनही त्या जीव धोक्यात घालून राज्य मार्गावर फायबर खुर्चीचा आधार घेत भंटकती करीत आहेत.
याच गावातील औदुंबर राऊत हा औषध दुकानदार त्या आजीबाईना कधी कधी जेवण पुरवतो. त्यांना आधार म्हणुन त्यांनीच चालण्यासाठी खुर्ची देखील दिली. शांताबाईंच्या घरापासून गावाचे अंतर जवळपास एक किलोमीटर आहे. ना पायात चप्पल, अशाच अवस्थेत खुर्चीवर ठेवलेले जेवण घेऊन त्या खुर्चीवर हात ठेऊन भरधाव वेगात चालणाऱ्या वाहनांमधून वाट काढत येणे-जाणे करतात. आजीबाईंची ही अवस्था पाहिली की मन सुन्न होतं. निराधार म्हातारपण किती भयंकर असते, याची प्रचिती शांताबाईंना पाहिल्यावर येते.
यावली सालसे राज्य महामार्गाचे काम पूर्ण झाल्याने वाहनांची वर्दळ वाढली आहे. त्यांना ऐकू येत नसल्याने अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गावातील राजकीय नेते मंडळीसह दानशूरांनी या आजींना आप आपल्या परीने मदतीचा हात देण्याची गरज आहे.
शांताबाईंना त्यांच्या उतार वयात कुणाचाच आधार नाही. एका खोलीत त्या एकट्याच बसून असतात. घसरुन पडल्याने त्या पायाने दिव्यांग झाल्यात. फायबर खुर्चीच त्यांच्यासाठी सध्या जीवनसाथी अन् आधार बनली आहे. त्यामुळे शांताबाई या निराधार आजींची व्यथा ध्यानी घेऊन दररोजची भुक भागेल एवढं अन्न आणि त्यांना चालण्यासाठी लागणाऱ्या वाॅकरची मदत देऊन सामाजिक बांधिलकी दाखवायला हवी.