सोलापूर - मोलमजुरी करून जीवन जगणाऱ्या एका दाम्पत्याने एकुलत्या एक मुलीचे नेत्रदान केले आहे. लातूर जिल्ह्यातल्या रेणापूर तालुक्यातील जाधव दाम्पत्याची एकुलती एक असलेली मुलगी सोनाली हिचा अपघातादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर मुलीच्या इच्छेप्रमाणे शोभा आणि शाहूराज जाधव यांनी मुलीचे नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला आहे.
शोभा आणि शाहूराव जाधव दोघेही पती-पत्नी लातूर शहरापासून जवळच असलेल्या हरंगुळ रेल्वे स्थानकाजवळील एका दाल मिलमध्ये मजुरीचे काम करतात. या दोघांना सोनाली नावाची एकुलती एक मुलगी होती. घरची हलाखीची परिस्थिती असल्यामुळे दहावीनंतर सोनालीचे शिक्षण अर्धवटच राहिले. सोनालीदेखील आईसोबत कामाला जात होती. अशातच रविवारी सोनाली आणि तिची आई लातूर शहरात बाजार करण्यासाठी गेले होत्या. रात्रीच्या वेळी परत आल्यानंतर हायवे क्रॉस करत असताना एका अज्ञात कारने सोनालीला जोरदार धडक दिली. अपघातानंतर कारचालक पळून गेला.
एकुलती एक असलेली सोनाली ही रक्ताच्या थारोळ्यात पडलेली असताना शोभा यांनी तिला लातूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. तीन दिवस लातूरमध्ये उपचार घेतल्यानंतर सोनालीला सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. सोलापुरातही तीन दिवस उपचार घेतल्यानंतर काल सोनालीची प्राणज्योत मालवली. ऐन तारुण्यात आलेली एकुलती एक मुलगी सोडून गेल्यानंतर जाधव दाम्पत्यावर चांगलाच आघात झाला. मात्र, यातून सावरत जाधव दाम्पत्यांनी मुलीच्या इच्छेप्रमाणे नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी सोनालीचे नेत्रदान केले आहे. मोलमजुरी करणाऱ्या या दाम्पत्याने एकुलत्या एका मुलीचे नेत्रदान करून समाजापुढे एक आदर्श उभा केला आहे.