सोलापूर - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्री. विठ्ठल-रुक्मिणी मातेचा माघी सोहळा रद्द करण्यात आला आहे. काल पंढरीत 70 ते 80 हजार भाविक दाखल झाले होते. मात्र, पोलिसांकडून प्रत्येक मठ रिकामे करण्याच्या नोटीस दिल्या होत्या. त्यामुळे, आज सकाळी पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देत 80 टक्के भाविकांनी परतीचा मार्ग धरला आहे. त्यामुळे, पंढरीत आता आठ ते दहा हजार भाविक असण्याची शक्यता आहे.
हेही वाचा - आखाती देशातील भारतीय मजुरांमुळे देशाला परकीय चलन, अर्थचक्रात उचलतात सिंहाचा वाटा
पंढरीतील गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाकडून उपाय योजना
माघी वारीनिमित्ताने पंढरीत येणारा वारकरी भाविक मोठ्या प्रमाणावर आहे. वारकऱ्यांची सोय पाचशेहून अधिक मठांमध्ये केली जाते. सध्या पंढरपुरात कोरोनाचे अॅक्टिव्ह 44 रुग्ण आहेत. त्यामुळे, विठ्ठलाचा होणारा माघी सोहळा प्रशासनाकडून रद्द झाला आहे. पंढरीत एका दिवसाची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. वारकऱ्यांची गर्दी होऊ नये म्हणून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. सध्या मठामध्ये चार ते पाच भाविक आहेत. त्यामध्ये विणेकरी, टाळकरी असणारे भाविक आहेत. नगरपालिकेकडून आरोग्य विषयी जनजागृती करण्यात येत आहे. दरम्यान, 22 ते 23 फेब्रुवारीपर्यंत विठ्ठल मंदिर भाविकांसाठी बंद राहणार आहे.
वारकऱ्यांचा अल्प प्रतिसाद
पंढरपूरच्या मठात राहणारी वारकरी अतिरेकी नव्हे, त्यांना भजनाची व कीर्तनाची परवानगी द्यावी. तसेच, पोलिसांनी वारकऱ्यांना हुसकावून लावू नये, अशी मागणी जेष्ठ कीर्तनकार ह.भ.प बंड्यातात्या महाराज कराडकर यांनी प्रशासनाला केली होती. वारकऱ्यांना मठ न सोडण्याचे आवाहन त्यांनी केले होते. मात्र, ह.भ.प बंडातात्या कराडकर यांनी केलेल्या आवाहनाला वारकरी संप्रदायाने अल्पसा प्रतिसाद दिला.
हेही वाचा - माढा तहसील कार्यालयाचे होणार तात्पुरते स्थलांतर, नवी इमारत बांधण्यासाठी प्रक्रिया सुरू