पंढरपूर - पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी पंढरपूर तालुक्यातील निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी तालुक्यात 8 हजार 151 मतदार असून, मतदानासाठी 20 मतदान केंद्रावर सोय करण्यात आली असल्याची माहिती प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली.
पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी तालुक्यात पदवीधर मतदार संघासाठी 5 हजार 122 पुरुष व 1 हजार 338 स्त्री असे एकूण 6 हजार 460 मतदार आहेत. तर शिक्षक मतदार संघासाठी 1 हजार 388 पुरुष व 303 स्त्री मतदार असे एकूण 1 हजार 691 मतदार आहेत. तालुक्यात दोन्ही मिळून एकूण 8 हजार 151 मतदार आहेत. त्यांना मतदान करण्यासाठी पदवीधर मतदारांसाठी 12 तर शिक्षक मतदारांसाठी 8 अशा एकूण 20 मतदान केंद्राची सोय करण्यात आल्याची माहिती ढोले यांनी दिली.
पदवीधर मतदारसंघासाठी द.ह.कवठेकर प्रशाला पंढरपूर - 5, कासेगांव-1, करकंब-2, भाळवणी-1, पुळूज-1, तुंगत-1 तर पटवर्धन कुरोली-1 येथील 12 मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. तर शिक्षक मतदारसंघासाठी द.ह.कवठेकर प्रशाला पंढरपूर -2, कासेगांव-1, करकंब-1, भाळवणी-1, पुळूज-1, तुंगत-1 तर पटवर्धन कुरोली-1 येथील 8 मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. निवडणुकींच्या कामासाठी एकूण 299 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासाठी 29 मतदान केंद्राध्यक्ष, 56 सहाय्यक मतदान केंद्राध्यक्ष, 120 मतदान अधिकारी तर 94 शिपायांची नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान उमेदवारांना आपले अर्ज 17 नोव्हेंबरपर्यंत काढून घेता येणार आहेत. मतदान दिनांक 1 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत होणार आहे. तर मतमोजणी दिनांक 3 डिसेंबर रोजी होणार आहे. कोविड-19 आजाराचा प्रादुर्भाव लक्षात घेता, निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार 700 पेक्षा जास्त मतदार संख्या असलेल्या केंद्रासाठी सहाय्यकारी मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत. अशी माहिती प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली.
हेही वाचा - साताऱ्याजवळ रस्ता ओलांडणाऱ्या बिबट्याचा वाहनाच्या धडकेत बळी
हेही वाचा - ...तर तुमचे सांगाडे बाहेर निघतील - संजय राऊत