सोलापूर - श्रावणामासानिमित्त निघणारी 68 लिंग पदयात्रा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय 68 लिंग भक्त मंडळ आणि वीरशैव व्हीजनने घेतल्याची माहिती भक्त मंडळाचे अध्यक्ष शिवानंद सावळगी यांनी दिली. या यात्रेमध्ये गर्दी होण्याची दाट शक्यता असते. म्हणून अशा परिस्थितीत फिजिकल डिस्टन्सिंग पाळणे महत्वपूर्ण आहे. यामुळे कोरोना संसर्गजन्य आजाराचा फैलाव होऊ नये, म्हणून हा निर्णय घेण्यात आला.
ग्रामदैवत शिवयोगी सिध्दरामेश्वर यांनी 68 लिंगांचे मंदिर स्थापन केले. यानंतर शहराच्या पंचक्रोशीतील नागरिकांना श्रावणाच्या पवित्र महिन्यात मंदिराचे दर्शन घेण्याचे पुण्य पदरी पडावे, म्हणून कै. उमाकांत सावळगी, कै. शरणप्पा मुद्देबिहाळ, संगप्पा बुरकुले, पावडेप्पा भुशेट्टी यांनी पदयात्रा सुरु केली. गेल्या अनेक वर्षांपासुन ही पदयात्रा अखंडितपणे सुरू आहे. बसवराज सावळगी यांच्या नेतृत्वाखाली 68 लिंग भक्त मंडळ आणि वीरशैव व्हीजन यांच्या वतीने या पदयात्रेचे आयोजन करण्यात येते.
हेही वाचा - पतंगबाजी : सोलापुरात जीवघेण्या नायलॉन मांजाची सर्रास विक्री; अनेक पक्षांनी गमावला जीव
श्रावणातील तिसऱ्या रविवारी प्रातःकाळी श्री सिध्देश्वर महाराज की जय आणि आणखी जयघोषात अभिषेक करुन दर्शन घेण्यात येते. यामध्ये शहराबरोबरच मुंबई, पुणे, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, अक्कलकोट आणि मोहोळ येथील जवळपास 300 भाविकांचा समावेश असतो. विशेष करुन या पदयात्रेत ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग उल्लेखनीय असतो. मात्र, यंदा कोरोनाचे संकट उभे आहे. त्यामुळे ग्रामदैवत सिद्धेश्वर आणि अन्य सर्वच मंदिरे सध्या बंद आहेत. यात्रा, उत्सव आणि पदयात्रा यावर शासनाने बंधने घातली आहेत. त्यामुळे ही पदयात्रा रद्द करावी लागत असल्याचे वीरशैव व्हिजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले यांनी सांगितले.
घरी राहूनच यंदा सर्व सद्भक्तांनी ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर व त्यांनी स्थापन केलेला 68 लिंग यांची आराधना करावी. तसेच कोरोनाचे संकट लवकरात लवकर दूर व्हावे यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.