सोलापूर - जिल्ह्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. आतापर्यंत नियमाचा भंग करणाऱ्यांकडून 61 लाख रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला होता.
शहरातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. अनलॉकचा निर्णय झाल्यानंतर सर्व बाजारपेठा सुरू झाल्या आणि सोलापूरातील कोरोनाची संख्या दिवसेंदिवस वाढत गेली. सुरूवातीचा दीड महिना जिल्ह्यामध्ये एकही कोरोनाबाधित रूग्ण आढळला नव्हता. मात्र, त्यानंतर जिल्ह्यातील बाधितांची संख्या तीन हजाराच्या वर गेली आहे.
सोलापूर शहर व जिल्ह्यातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नियम न पाळणाऱ्या विरूद्ध जिल्हा प्रशासनाने दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश काढले आहेत. आतापर्यंत नियमांचा भंग करणाऱ्यांकडून सुमारे 61 लाख 16 हजार 530 रुपयाचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. जिल्हा पोलीस अधीक्षक, तहसीलदार कार्यालय आणि नगरपालिका प्रशासनाकडून याबाबतची कारवाई करण्यात आली.
6 ते 15 जुलै दरम्यान ही कारवाई करण्यात आली. यामध्ये सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणे, दुचाकीवरुन दोघांनी प्रवास करणे, तीन, चार चाकी वाहनातून मर्यादेपेक्षा जास्त व्यक्तींचा प्रवास, निर्धारित वेळेनंतर दुकाने सुरु ठेवणे, सोशल डिस्टन्सिंग न पाळणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, सार्वजनिक ठिकाणी पान, तंबाखुचे सेवन करणे याबाबत कायदेशीर कारवाई केली आहे.
पोलीस अधिक्षकांनी 26 हजार 545 प्रकरणात 45 लाख 16 हजार 300 रुपयांचा दंड वसूल केला. सर्व तहसीलदार कार्यालयाने 8 हजार 580 प्रकरणात 11 लाख 96 हजार 50 रुपंयाचा तर सर्व नगरपालिका प्रशासनाने 2 हजार 996 प्रकरणात 4 लाख 4 हजार 180 रुपयांचा दंड वसूल केला आहे.