सोलापूर - शहरात संचारबंदीचे कडक पालन करण्यात येणार असून 10 दिवसाच्या संचारबंदीच्या काळात सोलापुरातील व्यक्तींची रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यासाठी 30 पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोरोनाची साखळी तोडून कोरोनाला हद्दपार करण्यासाठी महापालिका प्रयत्न करीत असून सोलापूरकरांनी देखील अँटिजेन टेस्ट करून घ्यावी, असे आवाहन महापालिका आयूक्त पी. शिवशंकर यांनी केले आहे.
लॉकडाऊनच्या अंमलबजावणीसाठी तीन शिफ्टमध्ये सोलापूर महापालिकेचे कर्मचारी काम करणार आहेत. संचारबंदीची कडक अंमलबजावणी व्हावी, यासाठी महापालिका सर्वोतोपरी काम करत आहे. संचारबंदीच्या काळात पोलिसांना सहकार्य करण्यासाठी महापालिकेचे कर्मचारी हे सहायक म्हणून काम करणार आहेत. सोलापूर शहरात रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यासाठीची जी पथक होती, त्यामध्ये वाढ करण्यात आली आहे. 30 नविन पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
15 नागरी आरोग्य केंद्रासाठी प्रत्येकी दोन पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. एक पथक हे आरोग्य केंद्रात असणार आहे. तर दूसरे पथक हे त्या आरोग्य केंद्राच्या परिसरातील वयोवृद्ध तसेच आजारी असलेल्या लोकांची आरोग्य तपासणी करणार आहे. सोलापूर शहरातील लोकांची रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यासाठी ही 30 पथके तयार करण्यात आली असल्याची माहिती सोलापूर महापालिका आयूक्त पी. शिवशंकर यांनी दिली.
कोरोना या आजाराची लक्षण दिसून येत असलेल्या लोकांनी तात्काळ रॅपिड अँटिजेन टेस्ट करून घ्यावा, जेणेकरून योग्य त्या व्यक्तीवर योग्य वेळी उपचार करणे शक्य होईल. ज्यांना लक्षणे दिसत आहेत, अशानी तात्काळ टेस्ट करून घेण्याची विनंती महापालिका आयूक्त पी. शिवशंकर यांनी केली आहे.