सोलापूर - सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील 152 पोलिसांना घरातच थांबण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील अधिकारी आणि पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामीण पोलीस दलातील 55 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या 14 अधिकारी आणि 138 कर्मचारी यांना घरीच राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सेवा बाजविणाऱ्या 14 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. वयस्कर असलेल्यांना कोरोनाचा जास्तीत जास्त धोका असल्यामुळे 55 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोणतेही काम न देता त्यांना घरीच राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती सोलापूर ग्रामीणचे अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी दिली आहे.
ज्या पोलीस अधिकारी किंवा कर्मचाऱ्याचे वय 50 वर्षांपेक्षा जास्त आणि 55 पेक्षा कमी आहे, त्या पोलीस अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना कंटेनमेंट झोनमध्ये पाठविण्यात येणार नाही. जे पोलीस कर्मचारी व अधिकारी हे सेवा बजावत आहेत त्यांना देखील रोग प्रतिकारक शक्ति वाढविण्यासाठीचे उपाय सूचविण्यात आले आहेत. तसेच पोलिसांच्या मदतीला ग्रामीण भागातील सशक्त असलेल्या तरुणांची मदत ही घेण्यात येत असल्याचेही झेंडे यांनी सांगितले.
हेही वाचा - सकारात्मक बातमी.. सोलापुरातील 31 जणांनी केली कोरोनावर मात